Ramprasad  Bordikar joins  bjp | Sarkarnama

अखेर रामप्रसाद बोर्डीकर भाजपमध्ये पवित्र  झाले !

सरकारनामा वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

होणार होणार म्हणून गाजत असलेला प्रवेश अखेर झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी बोर्डिकरांचे घोडे भाजपच्या गंगेत नाहले म्हणत सुटकेचा निश्वास सोडला आहे.  आता भाजपमध्ये प्रवेश झाला म्हणजे त्यांचे पूर्वीचे सर्व कर्म मागे पडून ते पवित्र  झाले असेच म्हणावे लागेल .

औरंगाबाद  :  गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी सर्व  बाजूनी मोर्चेबांधणी करणाऱ्या रामप्रसाद बोर्डीकर यांच्यावर अखेर देवेंद्रची कृपा  झाली आहे. मंगळवारी दिवसभराच्या प्रतिक्षेनंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत 
रात्री उशिरा काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना  भाजपमध्ये प्रवेश  देण्यात आला.

होणार होणार म्हणून गाजत असलेला प्रवेश अखेर झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी बोर्डिकरांचे घोडे भाजपच्या गंगेत नाहले म्हणत सुटकेचा निश्वास सोडला आहे.  आता भाजपमध्ये प्रवेश झाला म्हणजे त्यांचे पूर्वीचे सर्व कर्म मागे पडून ते पवित्र  झाले असेच म्हणावे लागेल .

रामप्रसाद बोर्डीकर हे कोणत्याही प्रश्नातून  आपल्या चातुर्यावर मार्ग काढण्यासाठी आजवर ओळखले गेले आहेत .  कमालीचे प्रयत्नवादी नेते म्हणून परभणी जिल्ह्यात प्रसिध्द आहेत. जिल्हा मध्यवर्ती  बँक आणि मुंबई  बाजार समितीत  त्यांनी केलेल्या "आर्थिक सुधारणा" गाजलेल्या  आहेत.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत त्यांच्या कार्यकाळात झालेले   750 कोटींचे  विमा विषयक प्रकरण  सध्या न्याय आणि विधी विभागातर्फे बारकाईने अभ्यासले  जात आहे . त्यामुळे त्यांना परभणी शहरात भाजपचा पक्षविस्तार करण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहता येत नसले  तरी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करू शकतील .  मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराच्या  विकासातबाबत  देखील त्यांना तळमळ आहे असे मानले जाते . 

परभणी जिल्ह्यातील कॉग्रेसचे बलाढ्य नेते म्हणून परिचित असलेले तथा जिंतूर  विधानसभेचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना गेल्या दोन - तीन  महिन्यांपासून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याचे वेध लागले होते. जिंतूर व सेलू नगरपालिके  पाठोपाठ जिल्हा परिषद कॉग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही निवडणुका माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या  नेतृत्वाखाली लढविल्या गेल्या होत्या. परंतू या दोन्ही निवडणुकांमध्ये कॉग्रेसला म्हणावे तसे यश आले नाही. 

या वेळी बोर्डीकरांनी कॉग्रेसमध्ये आता राम उरला नाही म्हणत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगुन टाकले होते.  पण त्यांच्या भाजप प्रवेशाला  भाजपमधील नेत्यांनी विरोध केला होता. माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी जिंतूरात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोर्डीकरांच्या भाजप प्रवेशाला विरोध  दर्शविला होता. त्यामुळे बोर्डीकरांनी देखील रेल्वे रुळ बदलतांना खडखडाट होणारच ...! असे सांगून आपला भाजप 
प्रवेश निर्धार कायम असल्याचे स्पष्ट केले होते . तेव्हापासूनच रामप्रसाद बोर्डीकरांना भाजपचे डोहाळे लागले होते. भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी बोर्डीकर यांचे मुंबईला अनेक दौरे झाले. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांची भेट  घेतल्याचे फोटो देखील सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले. 

रामप्रसाद बोर्डिकर जिंतूर विधानसभा मतदार संघातुन अनेकदा निवडून आलेले आहेत . मात्र  राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांनी त्यांना पराभूत केल्यानंतर वातावरण बदलेले आहे . जिंतूर मतदारसंघात  ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यत भांबळेंनी विजयी धडक मारलेली आहे .

 परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुक येत्या काही महिन्यात  होणार आहे. भाजपचे परभणी जिह्यातील बळ वाढविण्यासाठी ही निवडणूक लढविण्यासाठी बोर्डीकर यांना  भाजपतर्फे तयार  केले जाऊ शकते . 

 येणाऱ्या  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार अशी चिन्हे आहेत .  त्यामुळे शिवसेनेला  आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लढत देण्यासाठी रामप्रसाद बोर्डीकर यांच्या   कन्या मेघना साकोरे - बोर्डीकर यांचे नाव  भाजपच्या यादीत परभणीतून अग्रक्रमावर राहण्याची चिन्हे आहेत . 

 

संबंधित लेख