Ramesh Kadam Wants to Fight From Shivsena | Sarkarnama

तुरुंगात असलेल्या रमेश कदमांना व्हायचंय खासदार! : शिवसेनेच्या संपर्कात; दोन बैठका झाल्याची जिल्हाप्रमुखांची माहिती

परशुराम कोकणे
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कारागृहात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलंबीत आमदार रमेश कदम हे शिवसेनेचे धनुष्यबाण उचलण्यास इच्छूक आहेत. सोलापूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सोमवारी अधिकृत दुजोरा दिला.

सोलापूर : भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कारागृहात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलंबीत आमदार रमेश कदम हे शिवसेनेचे धनुष्यबाण उचलण्यास इच्छूक आहेत. सोलापूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सोमवारी अधिकृत दुजोरा दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात आमदार रमेश कदम हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सोलापूरसह राज्यभरात विविध ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल असून 2015 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून निलंबीत केले होते. तेव्हापासून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागल्याने आमदार रमेश कदम हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या संपर्कात आले आहेत.

"आमदार रमेश कदम यांनी स्वत:हून शिवसेनेशी संपर्क केला आहे. शिवसेना पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने कदम यांच्यासोबत दोन बैठका झाल्या आहेत. रमेश कदम हे सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत.लोकसभेला भारतीय जनता पार्टीसोबत युती झाली नाही तर आमदार कदम यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकेल. विधानसभा निवडणूकीसाठीही त्यांचा विचार केला जावू शकतो. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अनेक नेते राजकारणात आहेत. लोकसभा निवडणूकीत शिवसेनेकडून जो उमेदवार असेल त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत', असे वानकर यांनी सांगितले.

शिवसेनेकडून उमेदवारी नाही मिळाली तरी आमदार रमेश कदम हे शिवसैनिक म्हणून काम करण्यास इच्छुक आहेत. या अनुषंगाने दोन बैठका झाल्या आहेत. मोहोळ मतदार संघातील शिवसैनिकांनी होकार दिला तर रमेश कदम यांच्याबाबत पक्षाकडून सकारात्मक विचार केला जाऊ शकतो.
- गणेश वानकर,
जिल्हाप्रमुख, शिवसेना

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख