Ramdas athvale joins campaign | Sarkarnama

कार्यकर्त्यासाठी रामदास आठवले पोटनिवडणुकीच्या प्रचारात 

पांडुरंग सरोदे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

हिमाली कांबळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये आठवले स्वतः सहभागी झाले. याबरोबरच कोरेगाव पार्क-घोरपडी या प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन कांबळे यांच्यासाठी मते मागण्यासाठी आठवले पुढे होते. आठवले यांच्या या सहभागामुळे साहजिकच कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. त्यामुळे कांबळे यांच्या प्रचाराच्या रॅलीबरोबरच प्रचार यंत्रणेमध्ये हजारो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. 

पुणे : पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानंतर कोरेगाव पार्क-घोरपडी या प्रभाग क्रमांक 21 साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता संपत आला आहे. या निवडणुकीत "आरपीआय'चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुरवातीपासूनच बारकाईने लक्ष घातले आहे. आपल्याबरोबर गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या कांबळे यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतानाच सर्व कार्यकर्त्यांना मानसिक बळ देण्याचे काम आठवले करत आहेत. 

महापालिका निवडणुकीनंतर पक्षात नाराजी होती. कांबळे यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने "आरपीआय'मधील सगळ्यांनाच पुन्हा एकदा एकत्र आणले. एवढेच नव्हे, तर कांबळे यांच्या कन्या हिमाली यांच्यासाठी सर्वचजण पोटनिवडणुकीच्या मैदानात ताकदीनीशी उतरले. महापालिका निवडणुकीवेळी नाराज झालेल्या आठवले यांनी तेव्हा प्रचाराकडे पाठ फिरविली होती. 

या पोटनिवडणुकीमध्ये मात्र पहिल्या दिवसापासूनच त्यांनी लक्ष घातले आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सगळ्या पक्षांकडून पाठींबा मिळावा, यासाठी त्यांच्याकडे मागणी करणे, अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी निवडणुकीसाठीच्या "टिप्स' कार्यकर्त्यांना देण्यापासून ते थेट प्रत्यक्षात प्रचाराच्या रिंगणात उतरण्याचे कामही आठवले यांनी केले. 

हिमाली कांबळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये आठवले स्वतः सहभागी झाले. याबरोबरच कोरेगाव पार्क-घोरपडी या प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन कांबळे यांच्यासाठी मते मागण्यासाठी आठवले पुढे होते. आठवले यांच्या या सहभागामुळे साहजिकच कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. त्यामुळे कांबळे यांच्या प्रचाराच्या रॅलीबरोबरच प्रचार यंत्रणेमध्ये हजारो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. 

कांबळे यांच्या प्रेमापोटी अन्य पक्षांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत आठवले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या "असहकार' भूमिकेवर टिका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहकार्य केले असते तर निवडणुक बिनविरोध झाली असती, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टिका करण्याची संधी सोडली नाही.  

संबंधित लेख