Ramdas Athavle has been promised ministerial birth to fight loksabhaa | Sarkarnama

कॅबिनेट  मंत्रीपदाच्या आश्वासनामुळे आठवले लोकसभा मैदानात

प्रशांत बारसिंग
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

एनडीएची सन 2019 साली केंद्रात सत्ता आल्यास कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल, असे आश्वासन भाजपकडून मिळाल्याने रिपाई नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मतदारसंघाची बांधणी  नसताना लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. 

 

मुंबई : एनडीएची सन 2019 साली केंद्रात सत्ता आल्यास कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल, असे आश्वासन भाजपकडून मिळाल्याने रिपाई नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मतदारसंघाची बांधणी नसताना लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.

देशभरातील भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाल्याने 2014 च्या तुलनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार असल्याचे चित्र आहे. एका बाजूला एनडीएचे घटक पक्ष भाजपला सोडचिट्ठी देत असताना घटणाऱ्या संख्याबळाच्या शक्यतेने भाजपा नेते धास्तावले आहेत. त्यामुळे राज्यसभेतील काही खासदारांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून आठवले यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुन्हा सत्ता आल्यावर केंद्रात कैबिनेट मंत्रिपद मिळेल, असा त्यांना निरोप दिल्याची चर्चा आहे.

वास्तविक पाहता आठवले यांनी स्वबळावर  राज्यात एकही  मतदारसंघ बांधला नाही. 1998 च्या निवडणुकीत जनतेच्या रेटयापुढे झालेले रिपब्लिकन ऐक्य आणि एकसंध कोंग्रेसमुळे रिपाईचे चार खासदार निवडून आले होते. त्यात दक्षिण-मध्य मुम्बईतुन आठवले निवडून आले होते. त्यानंतरच्या दोन टर्म त्यांनी राष्ट्र्वादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंढरपुर  येथून लोकप्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादीशी काडिमोड झाल्यावर 2009 च्या निवडणुकीत आठवले कोंग्रेसच्या पाठिंब्यावर शिर्डीतुन लढले मात्र पराभूत झाले. 

आठवले सध्या राज्यसभेत भाजपचे खासदार आहेत. इतक्या वर्षात त्यांनी राज्यातील कोणताही मतदारसंघ बांधला नाही. परंतु भाजपच्या निरोपामुळे त्यांनी पहिल्यांदा निवडून आलेला मुंबईतील मतदारसंघ निवडला आहे. दक्षिण-मध्य मुम्बईत दलित-मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असले तरी ही जनता अनेक पक्ष आणि गटातटात विभागली गेली आहे. त्यामुळे आठवले यांची वाट बिकट असल्याचे सध्याचे राजकीय चित्र आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख