Ramdas Athavle to Give Answer to Prakash Ambedkar | Sarkarnama

औरंगाबादच्या त्याच मैदानातून रामदास आठवले देणार प्रकाश आंबेडकरांना उत्तर 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 6 जानेवारी 2019

वंचित बहुजन आघाडीची दोन ऑक्‍टोबर 2018 रोजी औरंगाबादच्या जाबिंदा मैदानावर रेकॉर्डब्रेक सभा झाली होती. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या या संयुक्त सभेने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते.या सभेचा सगळ्याच राजकीय पक्षांनी धसका घेतला होता. तसा तो रामदास आठवले यांच्या रिपाइंने देखील घेतला. तेव्हापासूनच औरंगाबादच्या याच मैदानावर वंचित आघाडीच्या सभेपेक्षा मोठी सभा घेण्याचा निर्धार रामदास आठवलेंनी केला होता. 

औरंगाबाद : रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या 10 फेब्रुवारी रोजी औरंगाबादेत आपल्या पक्षाच्या मराठवाडा विभागाचा भव्य मेळाव घेणार आहेत. विशेष म्हणजे ऑक्‍टोबर महिन्यात वंचित बहुजन आघाडी, एमआयएमचा संयुक्त मेळाव्या ज्या जांबिदा मैदानावर झाला होता, त्याच मैदानाची निवड आठवले यांनी केली आहे.आता या सभेपेक्षा जास्त गर्दी जमवून प्रकाश आंबेडकरांना उत्तर देण्याची तयारी रामदास आठवले यांनी चालवली असल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

वंचित बहुजन आघाडीची दोन ऑक्‍टोबर 2018 रोजी औरंगाबादच्या जाबिंदा मैदानावर रेकॉर्डब्रेक सभा झाली होती. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या या संयुक्त सभेने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते.या सभेचा सगळ्याच राजकीय पक्षांनी धसका घेतला होता. तसा तो रामदास आठवले यांच्या रिपाइंने देखील घेतला. तेव्हापासूनच औरंगाबादच्या याच मैदानावर वंचित आघाडीच्या सभेपेक्षा मोठी सभा घेण्याचा निर्धार रामदास आठवलेंनी केला होता. 

4 नोव्हेंबर रोजी औरंगाबादच्या जांबिदा मैदानावर आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट फेस्टीव्हल घेण्यात आला. देश विदेशातून या परिषदेसाठी पाहुणे आले होते. पण या परिषदेसाठी भाजप सरकारने मदत केल्याचा आरोप करत बुध्दीस्ट फेस्टीव्हलला कुणी जाऊ नये असे आवाहन काही संघटनांकडून करण्यात आले होते. परिणामी रिकाम्या खुर्च्यांच्या उपस्थितीतच ही परिषद पार पडली. बुध्दीस्ट फेस्टीव्हलच्या समारोपासाठी रामदास आठवले यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी केलेल्या भाषणात आठवले यांनी रिकाम्या खुर्च्या पाहून नाराजी व्यक्त केली होती. शिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या सभेपेक्षा मोठी सभा आपण याच मैदानावर घेऊ असे जाहीर केले होते. 

त्यानुसार 10 फेब्रुवारीला जांबिदा मैदानावर रिपाइंचा मराठवाडा विभागीय मेळावा होणार आहे. रामदास आठवले यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यांतील हाडवैर सर्वश्रुत आहे. आता आठवले वंचित आघाडीच्या सभेपेक्षा जास्त गर्दी जमवणार का? आणि प्रकाश आंबेडकरांना ते कसे उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
संबंधित लेख