आठवलेंना वगळून आंबेडकरी पक्ष, संघटनांच्या ऐक्‍यासाठी शनिवारी बैठक

आठवलेंना वगळून आंबेडकरी पक्ष, संघटनांच्या ऐक्‍यासाठी शनिवारी बैठक

मुंबई : मागील काही वर्षांत आपली राजकीय पत गमावलेले राज्यातील आंबेडकरी पक्ष, संघटना आपली राजकीय ताकद आणि त्यासाठीची वाटचाल काय असावी यासाठी पुन्हा एकदा जमवाजमव करण्यासाठी एकत्र येत आहेत.

येत्या शनिवारी (10 जून) रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जे. पी. नाईक भवन, येथे एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने आपापले पक्ष-संघटना कायम ठेवून राज्यात आंबेडकरी राजकीय विचारांची एक व्यापक आघाडी उभी करण्यावर चर्चा केली जाणार आहे.

या महत्त्वाच्या बैठकीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री व रिपाइंचे नेते रामदास आठवले यांचा अपवाद वगळता इतर सर्व राजकीय पक्ष, संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी, सहभागी होणार आहेत. 

राज्यात आंबेडकरी पक्ष, संघटनांचे ऐक्‍य व्हावे, त्यांना वैचारिक पातळीवर एकत्र आणण्यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला असून त्या पार्श्वभूमीवर 16 एप्रिल रोजी मुंबई विद्यापीठातच आंबेडकरी राजकारणाची सद्यःस्थिती आणि पुढील वाटचाल, याविषयावर सविस्तर चर्चा झाली होती.

या बैठकीत झालेली चर्चा आणि त्यानंतरचा आढावा या शनिवारी घेतला जाणार आहे. त्यात राज्यातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या संभाव्य आघाडीचा कृती कार्यक्रम ठरविला जाणार आहे. त्यासोबतच निवडणूक पद्धत बदलासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर जनजागृतीसाठी कार्यक्रमांची आखणी करणे आदी विषय या बैठकीत चर्चेला घेतले जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. 


या बैठकीत प्रामुख्याने रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने, भारिप बहुजन महासंघाचे सरचिटणीस ज. वि. पवार, स्वराज्य आंदोलनाचे ललित बाबर, सेक्‍युलर मुव्हमेंटचे प्रा. गौतमीपुत्र कांबळे, बहुजन क्रांती मोर्चाचे विजय वाघचौरे, श्रमिक मुक्ती दल -लोकशाहीवादी संघटनेचे धनाजी गुरव, एससी, एसटी, ओबीसी स्टुडंट ऍण्ड टीचर्स असोसिएशनचे संजय वैराळ, रिपब्लिकन विचार संवर्धन समितीचे रमेश जीवने, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वहाणे, फॅंम संघटनेचे ऍड. हरिश निरभवणे, डॉ . तुषार जगताप आदी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com