ramdas athavale and rpi | Sarkarnama

रामदास आठवलेंना आहे मैदान न भरल्याचे शल्य...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ऍड. प्रकाश आंबेडकर आणि रिपाइंचे रामदास आठवले यांच्यातील स्पर्धा आणि वैर नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. तिसऱ्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल फेस्टीव्हलच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा समोर आले. या महोत्सवाचा समारोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पार पडला. पण रिकाम्या खुर्च्या पाहून नाराज झालेल्या आठवले यांनी याच मैदानावर पक्षाचा मेळावा घेऊन गर्दी जमवून दाखवतो, अशी घोषणा केली.

औरंगाबाद : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ऍड. प्रकाश आंबेडकर आणि रिपाइंचे रामदास आठवले यांच्यातील स्पर्धा आणि वैर नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. तिसऱ्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल फेस्टीव्हलच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा समोर आले. या महोत्सवाचा समारोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पार पडला. पण रिकाम्या खुर्च्या पाहून नाराज झालेल्या आठवले यांनी याच मैदानावर पक्षाचा मेळावा घेऊन गर्दी जमवून दाखवतो, अशी घोषणा केली. या घोषणेतून ज्या मैदानावर प्रकाश आंबेडकरांची लाखांची सभा झाली, तेच मैदान बुद्धिस्ट फेस्टीव्हलला मात्र रिकामे राहते याचे शल्य आठवले यांना बोचल्याची चर्चा आहे. 

औरंगाबादच्या बीड बायपास रोडवरील जाबिंदा मैदानावर तिसरा बुद्धिस्ट आंतराष्ट्रीय फेस्टीव्हल पार पडला. समारोपासाठी रामदास आठवले, राज्यातील सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण यंदाच्या महोत्सावाला वादाची किनार असल्यामुळे समाज बांधवांनी त्याकडे सपशेल पाठ फिरवली. 
त्यामुळे हजार-पाचशेंच्या गर्दीसमोर भाषण करण्याची वेळ आठवले, बडोले या मंत्र्यावर आली. भीमा कोरेगाव, जळगांव जिल्ह्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित आदिवासी मुलांना झालेली मारहाण, देशात दलितांवर होणारे हल्ले, ऍट्रॉसिटीच्या विरोधातील आंदोलन, राजधानी दिल्लीत घटना जाळण्याचा झालेला प्रकार यामुळे भाजप सोबत सत्तेत असलेल्या विशेषतः केंद्रातील रामदास आठवले यांच्या बद्दल दलित समाजामध्ये तीव्र भावना आहेत. 

दलित ऐक्‍याचे प्रयत्न देखील प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यातील वादामुळे यशस्वी होऊ शकले नाही. आंबेडकरांनी दलित ऐक्‍यासाठी आठवलेना मंत्रीपद सोडण्याचे आव्हान केले, तर माझे मंत्रिपद रद्द करण्यासाठी ऐक्‍य होणार असेल तर मला ते मान्य नाही असे उत्तर देत आठवलेंनी कुरघोडी केली होती. त्यामुळे दलित ऐक्‍याचा प्रयोग राज्यात फसला, आणि आंबेडकर-आठवले कधीच एकत्र येऊ शकत नाही हे देखील स्पष्ट झाले. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी वंचितांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीची मोट बांधली. सोबतीला एमआयएमही आली आणि त्यांचा हा प्रयोग महाराष्ट्रात कमालीचा यशस्वी झाला. 

पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रकाश आंबेडकरांच्या सभांना लाखांची गर्दी व्हायला लागली. दोन ऑक्‍टोबर रोजी याच जाबिंदा मैदानावर प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची रेकॉर्डब्रेक सभा झाली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांना अधिकच महत्व प्राप्त झाले. त्यामुळे आंबेडकरांची रेकॉर्डब्रेक सभा झालेले मैदान रामदास आठवले यांच्या भाषणाच्यावेळी मात्र रिकामे होते. गर्दी न होण्याचा थेट संबंध रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकारंचे नाव न घेता त्यांच्यांशीच जोडला. भीमा कोरेगांव प्रकरणानंतर राज्यभरात झालेल्या आंदोलनात 80 टक्के माझे कार्यकर्ते होते, मंत्री असल्यामुळे मला उघड भूमिका घेता येत नाही, संविधानाचे रक्षण करण्यासाठीच आपण भाजप सोबत आहोत अशी विधान आठवलेंनी आपल्या भाषणातून केली. गर्दी जमवण्यात मी एक्‍सपर्ट आहे, लवकरच आपल्या पक्षाचा मेळावा याच मैदानावर घेऊन लाखांची सभा घेतो अशी घोषणा देखील रामदास आठवले यांनी केली. 

बुद्धिस्ट आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या व्यासपीठावरून रामदास आठवले यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. हे करत असतांनाच प्रकाश आंबेडकरांच्या सभेला झाली तितकीच गर्दी आपणही जमवू असे सांगत बुद्धिस्ट फेस्टीव्हलकडे पाठ फिरवणाऱ्या समाज बांधवाबद्दलचीही नाराजी आठवले यांनी यावेळी बोलून दाखवली. 

संबंधित लेख