Ramdas Athavale About Shivsena | Sarkarnama

शिवसेनेने सत्तेत असल्यासारखे वागावे - रामदास आठवले यांचा सल्ला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. शिवसेनेची आणि विरोधी पक्षाची भूमिका रास्त आहे, मात्र त्यासाठी लागणारे तीस पस्तीस हजार कोटी रुपये कसे उभे करावेत हेही त्यांनी सांगितले पाहिजे - रामदास आठवले

औरंगाबाद -  शिवसेना भाजपने एकत्रच रहावे आणि शिवसेनेने सरकारमध्ये असल्यासारखेच वागले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबादेत बोलताना दिला. शहरामध्ये एका शाळेच्या कार्यक्रमासाठी रामदास आठवले आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तीन वर्ष पुर्ण होत आहेत. त्याबद्दल बोलताना आठवले म्हणाले, ''तीन वर्षाच्या काळात मोदी सरकारने अनेक चांगल्या योजना जाहिर केल्या आहेत. मोदी हे आरक्षणाच्या विरोधात असल्याचा चुकीचा प्रचार आहे. ते आरक्षणाच्या बाजूने आहेत, त्यांनी यापुर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरएसएसनेही घटनेने ज्यांना आरक्षण दिले, त्यांना आमचा विरोध नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे हे सरकार घटनाविरोधी म्हणणे योग्य नाही.''

ते पुढे म्हणाले, ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगातील अद्यायवत असे दिव्यभव्य स्मारक साकारत आहे, स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा बाबासाहेबांचा हा पुतळा उभा राहणार आहे. बाबासाहेबांचे जन्मस्थळ असलेले महू, लंडन येथील बाबासाहेब राहत असलेले घर, चैत्यभूमी, दिक्षाभुमी आणि दिल्ली येथील 26 अली रोडवरील बंगला अशी पंचतीर्थस्थळांच्या विकासाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली असून, त्याच्या कामांना प्रारंभ झालेला आहे.''

आरक्षण हे पन्नास टक्‍क्‍यापेक्षा अधिक जाऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलेले आहेच. त्यामुळे उर्वरित पन्नास टक्‍क्‍यातून मराठा, मुस्लिम, जाट किंवा अन्य जातींना आरक्षण देण्यासाठी 25 टक्के आरक्षणाचा कायदा केला, तर हा प्रश्‍नच संपुष्टात येईल अशी भूमिका आठवले यांनी मांडली. 25 टक्के आरक्षणाचा कायदा करुन 'क्रिमेलिअर'ची अट घालून आरक्षण द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. शिवसेनेची आणि विरोधी पक्षाची भूमिका रास्त आहे, मात्र त्यासाठी लागणारे तीस पस्तीस हजार कोटी रुपये कसे उभे करावेत हेही त्यांनी सांगितले पाहिजे असे सांगताना आठवले म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती करण्याची सरकारची आहे. शिवसेना सत्तेत राहून सत्ता विरोधी वक्तव्य करत आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत असल्यासारखे वागावे असा सल्ला त्यांनी शेवटी दिला.

संबंधित लेख