ramdas aathawale nagar tour | Sarkarnama

अत्यल्प गर्दीमुळे आठवले गाडीतून उतरलेच नाहीत! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

हा महामेळावा नव्हे, तर केवळ मेळावाच आहे !

नगर : रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) जिल्हा शाखेतर्फे आयोजित केलेल्या महामेळाव्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आले अन्‌ गाडीतून न उतरता लगेच निघून गेले. त्यांच्या या कृतीमागे कारण होते मेळाव्याला जमलेली अत्यल्प गर्दी. "हा महामेळावा नव्हे, तर केवळ मेळावाच आहे,' असा उल्लेख खुद्द आठवले यांनीच आपल्या भाषणात केला. 

भर दुपारी तीन वाजता मेळाव्याचे आयोजन केले होते. उन्हाचा चटकाही जास्तच होता. त्यामुळे कार्यकर्ते आले आणि आजूबाजूला सावलीचा आधार घेऊन बसले होते. आठवले यांच्या वाहनांचा ताफा तेथे सायंकाळी वाजून 34 मिनिटांनी आला. प्रवेशद्वारातून थेट व्यासपीठापर्यंत ही वाहने आली. पोलिसांनी आपल्या वाहनांतून उड्या घेत आठवले यांच्या वाहनाकडे धाव घेतली; मात्र आठवले उतरलेच नाही. गाडी मागे घेत वळवून आल्या दिशेने निघाले. हे पाहून संयोजकांसह सर्वच गोंधळून गेले. पोलिसांचीही धावपळ उडाली. मेळाव्याला झालेली अत्यल्प गर्दी पाहून आठवले वाहनातून उतरलेच नाही. त्यानंतर ते पुन्हा कार्यक्रमस्थळी पाच वाजून 12 मिनिटांनी आले. त्या वेळीही गर्दी समाधानकारक नसली, तरी ऊन कमी झाल्याने बऱ्यापैकी लोक खुर्च्यांवर बसले होते. 

महामेळाव्याला जमलेल्या गर्दीचा उल्लेख मेळाव्याचे संयोजक पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनीही केला. "रात्रंदिवस फिरून जिल्ह्यात बैठका घेतल्या. आठ-दहा वाहने भरून लोक येतील, असे आश्‍वासन सर्वांनी दिले; पण ते आलेच नाहीत, त्याला काय करावे,' असा खुलासेवजा प्रश्‍न करून, गर्दी कमी झाल्याबद्दल माफीही मागितली. श्रीकांत भालेराव, पवन साळवे, दीपक गायकवाड यांनीही गर्दीचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली. आठवले यांनीही तोच धागा पकडत, ""खुर्च्या भरल्या असल्या, तरी बऱ्याच रिकाम्या आहेत. त्यामुळे हा महामेळावा नव्हे, तर केवळ मेळावा आहे. पुढील वेळी खऱ्या अर्थाने महामेळावा घ्या,'' असा सल्ला दिला. 

संबंधित लेख