For This Ram Temple BJP , Shiv Sena & Congress are togather | Sarkarnama

या राम मंदिरासाठी शिवसेना-भाजप बरोबर काँग्रेससुद्धा सहभागी  !

सरकारनामा ब्युरो   
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

या सोहळ्याला किशनचंद तनवाणी यांनी प्रदीप जैस्वाल, सुभाष  झांबड   आदी नेत्यांना देखील आमंत्रित केले होते. एक ते दीड कोटी रुपये खर्चून या राम मंदिराचा भव्य असा जिर्णोधार केला जाणार असल्याचे बोलले जाते.

औरंगाबादः अयोध्येतील  राम मंदिर हा शिवसेना-भाजपमधील तणावात  कळीचा मुद्दा बनत असला तरी इकडे औरंगाबादेत मात्र एका जुन्या राम मंदिराच्या  जीर्णोद्धारासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. एवढेच नव्हे तर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सुभाष  झांबड    हे देखील या कामात सहभागी झाले आहेत . 

शहराचे ह्दयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमंडी येथे पन्नास-साठ वर्षापुर्वीचे जुने राम मंदिर आहे. या मंदिराची दुरावस्था होऊन ते मोडकळीस आले होते. या मंदिरासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टने याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे आज राम मंदिराची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. 

सध्या आयोध्येतील राम मंदिराचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुर्ण बहुमताचे सरकार येऊन देखील भाजपला राम मंदीर का बांधता आले नाही? असा सवाल शिवसेनेसह विरोधी पक्षाकंडू केला जातोय. भाजपने केवळ रामच्या नावावर राजकारण केल्याचा आरोप देखील होत आहे. शिवसेना यात आघाडीवर आहे. अगदी आयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी स्वत उध्दव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे. 

राम मंदिरावरू तिकडे दिल्ली आणि राज्यातील राजकारण तापत असतांना औरंगाबादेत भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी देखील एका राम मंदिराच्या जिर्णोधाराचा संकल्प हाती घेतला आहे. विशेष म्हणजे तनवाणी यांचे शिवसेनेतील एकेकाळचे सहकारी माजी आमदार प्रदीप जैस्वाल, कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सुभाष झाबंड अशा सगळ्याच पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांना या कामासाठी तनवाणी यांनी सोबत घेतले आहे. 

शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून गुलमंडी ओळखली जाते. गोविंदभाई श्रॉफ, दादासाहेब गणोरकर आदी जुन्या नेतेमंडळींनी याच गुलमंडीवरून आपले राजकारण केले. पुढे शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी यांनी देखील गुलमंडीवरून राजकारण हाकण्याचा पायंडा सुरू ठेवला आहे. 

जुन्या सेंट्रल बॅंकेच्या शेजारी पुरातन राम मंदिर होते. गुलमंडीवरचे व्यापारी, उद्योगपती व नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी यायचे. कालांतराने हे मंदिर जीर्ण झाले, सेंट्रल बॅंकेची इमारत देखील भुईसपाट झाली. आता या राम मंदिराचा नव्याने जिर्णोधार करण्याची मोहिम तनवाणी यांनी हाती घेतली आहे. 

विजयादशमीच्या मुर्हूतावर तनवाणी यांनी राम मंदिराच्या जिर्णोधारासाठी भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन मंदिर परिसरात केले होते. या सोहळ्याला तनवाणी यांनी प्रदीप जैस्वाल, सुभाष  झांबड   आदी नेत्यांना देखील आमंत्रित केले होते. एक ते दीड कोटी रुपये खर्चून या राम मंदिराचा भव्य असा जिर्णोधार केला जाणार असल्याचे बोलले जाते.
 

संबंधित लेख