ram shinde criticise jayant patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

जयंत पाटलांवर मजबुरीची वेळ कां आली?: शिंदे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीला पूर्ण जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत. आतापर्यंत स्वतंत्र लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात कॉंग्रेसशी आघाडी करण्यासाठी मजबुरीची वेळ का आली, याचे उत्तर द्यावे. जयंत पाटील यांचे हे अपयश आहे, अशा शब्दात जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. 

सांगली : महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीला पूर्ण जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत. आतापर्यंत स्वतंत्र लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात कॉंग्रेसशी आघाडी करण्यासाठी मजबुरीची वेळ का आली, याचे उत्तर द्यावे. जयंत पाटील यांचे हे अपयश आहे, अशा शब्दात जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. 

महापालिका निवडणूक प्रचारासाठी जलसंधारणमंत्री आज सांगलीत आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले,"निवडणूक प्रचारात मतदारांच्या भावना समजावून घेतल्या. भाजपच्या दोन आमदारांनी 53 कोटी रुपयांची 284 कामे येथे केली आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचीच सत्ता आहे. भाजपच विकास करू शकतो ही मतदारांमध्ये भावना आहे.

गेल्या 20 वर्षांत महापालिका क्षेत्रात विकास कामे झालीच नाहीत. मुख्यमंत्री विशेष निधीतून होणाऱ्या विकास कामात अडथळे आणण्याचे काम कॉंग्रेस व राष्ट्रवादी करत आहे. अन्य महापालिकांच्या तुलनेत सांगली महापालिकेत विकास झाला नाही. भाजप सत्तेवर आल्यानंतर स्मार्ट सिटीत समावेश होण्यासाठी प्रयत्न करू.'' 

प्रा. शिंदे म्हणाले,"भाजपावर टीका करणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत: महापालिकेत काय दिवे लावले? लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांचा डाव मतदार उधळून लावतील. आमच्यावर उमेदवार आयात केल्याची टीका करणाऱ्यांच्या पक्षात तेच घडत आहे. त्याचे अनेक दाखले देता येतील. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना आत्मचिंतन केल्यानंतर कदाचित जुनी आठवण येत असेल. आम्ही निवडणुकीत 78 उमेदवार उभे केले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादीला सर्व जागांवर उमेदवार देता आले नाहीत. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यातच सर्व जागांवर उमेदवार मिळाले नाहीत. यातच अपयश दिसून येते.'' 

आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश सरचिटणीस रघुराज कुलकर्णी, दीपक शिंदे, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यावेळी उपस्थित होते. 
 

संबंधित लेख