ram kadam blog | Sarkarnama

मुली उचलायला, काय मोगलाई लागली आहे का ? 

प्रकाश पाटील 
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

राज्यात किती सुंदर मुलींचे चेहरे ऍसिड हल्ल्यात विद्रूप झाले. हे चेहरे विद्रूप करणारे एकतर्फी प्रेम करणारे गुंड होते. सांगलीत दिवसाढवळ्या अमृता देशपांडेचा खून तर उल्हासनगरात रिंकू पाटीलला जीवंत जाळण्यात आले. या निष्पाप मुलींनी जीव वाचविण्यासाठी केलेला आक्रोश महाराष्ट्र आजही विसरलेला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे "बेटी बचाव'चा नारा देतात आणि त्याच पक्षाचे आमदार राम कदम दुसरीकडे मुली उचलण्याची भाषा करतात ? यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय असू शकते. 

पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात आता कुठे महिलांना स्वातंत्र्य मिळाले. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या कुठे उंच भरारी घेता आहेत. आज असे कुठलेही क्षेत्र शिल्लक नाही की जेथे महिला नाही. सर्वत्र असे आशादायक चित्र असले तरी महिला आणि मुलींना एक स्त्री म्हणून आजही भोगावे लागते. अन्याय, अत्याचार सहन करावा लागतो. पुरुषी वर्चस्वाने ती दबलेली आणि पिचलेली आहे. 

आपण कितीही पुरोगामीत्वाच्या आणि सुधारणावादाच्या गप्पा मारत असलो तरी महिलांचे शोषण काही थांबलेले नाही. ते थांबेल असे वाटत नाही. स्त्री ही पुरुषाची दासी, गुलाम आहे ही विकृत मानसिकता आपल्या मनातून कधी निघणार नाही. राम कदम यांच्यासारखे वाचाळवीर आणि सामाजिक भान नसलेले बेजबाबदार नेते आपल्या अकलेचे तारे तोडतात. मुली पळवून आणण्याची भाषा करतात. अशा या भाजपच्या रामाचा निषेध करावा तितका कमीच आहे. माझी मुलगी उंबऱ्याबाहेर पडली तर ती सुरक्षित घरी येऊ शकते का ? अशा चिंतेत असलेल्या मायबापांना राम कदमांनी अधिक चिंतेत टाकले आहे. 

घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात कदम म्हणाले, की तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असं म्हणत मुक्ताफळे उधळली. कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले, की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा." वा रे वा बेट्या ! 

खरे तर दहीहंडी उत्सव हा विशेषत: तरुण-तरुणींचा. या उत्सवात आबालवृद्ध सहभागी होतात. जशी मुलं दहीहंडी फोडतात तसेच मुलीही कमी नाहीत. मुंबईतच नव्हे तर राज्यभर खास मुलींसाठीही दहीहंडी उत्सव होत असतात. याचाच अर्थ आपण समानतेने मुलामलींकडे पाहतो. हे वर्षानुवर्षे दहीहंडी उत्सव आयोजित करणाऱ्या कदमांनी लक्षात घेण्याची गरज होती. 

मुख्यमंत्री आले. बॉलिवूडसह मराठा तारका आल्या. कोट्यवधीची उधळण केली म्हणजे खूप शहाणे झालो. आपण काही बोललो तर लोक ते विनोदाने घेतात हा समज त्यांनी करून घेतलेला दिसतो. खरेतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान उपटण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनीही गोविंदा, गोपाळा म्हणत या उत्सवात सहभाग घेतला. ते कदमांच्या दहीहंडीलाही उपस्थित राहिले. पण, या उत्सवावर कदम यांनी पाणी फिरविले. त्यांनी उधळलेली मुक्ताफळे खरे तर भाजप सारख्या संस्कृती आणि परंपरेचा अभिमान सांगणाऱ्या पक्षातील नेत्यांनाही रुचला असेल वाटत नाही. 

सार्वजनिक जीवनात वावरत असताना सभ्यता बाळगावी लागते. शिवराळ बोलणे किंवा एखाद्याला शिव्याशाप देणे सोपे असते. पण, एक सुसंस्कृत नेते म्हणून वागणे, बोलणे किती अवघड असते हे कदमांना कोण सांगणार ? आपण खूप मोठे नेते आहोत. आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आहोत म्हणून आपण काहीही बोलले तर खपवून घेतले जाते असा जर कोणी समज-गैरसमज करून घेतला असेल तर त्यांनी तो डोक्‍यातून काढून टाकलेला बरा. 

कदम यांचे वादग्रस्त विधान संताप आणणारे का आहे ? याचे दुसरे आणि महत्त्वाचे कारण असे की, राज्यात कितीतरी सुंदर मुलींचे चेहरे ऍसिड हल्ल्यात विद्रूप झाले. हे चेहरे विद्रूप करणारे एकतर्फी प्रेमप्रकरणारे गुंड होते. सांगलीत अमृता देशपांडेचा, उल्हासनगरात रिंकू पाटील यांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. या निष्पाप मुलींनी जीव वाचविण्यासाठी केलेला आक्रोश महाराष्ट्र आजही विसरलेला नाही. या घटनांनी समाजमन सुन्न झाले होते. 

कदम हे सार्वजनिक जीवनात आहेत त्यामुळे त्यांना या घटना कधी आठवत असतील किंवा त्यांना कोणी तरी आठवण करून देण्याची गरज आहे. हे सर्व का होते तर एकतर्फी प्रेमप्रकरणातून. टवाळखोर, मवाली आणि गुंडगिरी करणाऱ्या मुलांचा उच्चशिक्षित मुली कशा काय हात धरू शकतील ? एखादी मुलगी आवडली म्हणजे तिला मागण घालायचं. तिचा हात धरायचा. जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडायचे का ? 

आपल्या मुलीचे हात पिवळे करण्यापूर्वी तिचे आईबाबा आपला होणारा जावई कोणत्या संस्कृती वाढतो याचा विचार करतात. एखादी मुलगी डॉक्‍टर असेल आणि राम कदमांच्या एखाद्या टपोऱ्या कार्यकर्त्याला ती आवडली आणि मागणी घातली तर त्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून द्यायचे का ? जर त्या मुलीचे आईवडील नाही म्हणाले तर त्या मुलीचे अपहरण करणार का ? याचे उत्तरही कदम यांनी द्यायला हवे. 

राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, अनुताई वाघ, तारा मोडक, गोदाबाई परुळेकर आदी रणरागिणींचा हा महाराष्ट्र. त्याच मराठी मुलुखात मुली उचलण्याची भाषा जर कोणी करीत असेल तर ती कदापि सहन करता कामा नये. कदम जेथे जातील तेथे महिलांनी त्यांना हिसका दाखविलाच हवा. म्हणजे पुढे कोणी अशी विधाने करताना धजावणार नाही. 

इतिहासात डोकावलं तर आपल्या लक्षात येईल की ज्यांनी वाणीवर संयम ठेवला, त्यांच्या चरित्राचे गायन आजही केले जाते. बोल कसे असावेत शांतीयुक्त,आदरयुक्त, स्नेहयुक्त. वाणीत जर सभ्यता असेल तरच तुमचे बोल हिरे व मोती पेक्षा अधिक मूल्यवान मानले जातील. म्हणून तोडणं अधिक सोप असतं आणि जोडणं खूप कठीण असतं. 

म्हणून आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाऊ नये ही सांभाळण्याची जबाबदारी राम कदम यांच्यासह आपल्या सर्वांचीच आहे. त्यासाठी एकाच गोष्टीची आवश्‍यक्ता असते ती बोलण्यावर, जीभेवर संयम ! 

संबंधित लेख