Raksha Khadse & Raver | Sarkarnama

भाजपच्या रक्षा खडसेंविरूद्ध लढायचे कोणी? कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे ठरेना

कैलास शिंदे
शनिवार, 23 मार्च 2019

जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपची उमेदवारी जाहिर झाली. 

जळगाव  : जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपची उमेदवारी जाहिर झाली.  मात्र त्यांच्या विरूध्द विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार नव्हे तर अद्याप जागेचे निश्‍चित होत नाही. ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे, कॉंग्रेसने त्याची मागणी केली आहे. परंतु अद्यापही त्याचा निर्णय झालेला नाही. 

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मुक्ताईनगर मतदार संघ रावेर मतदार संघात आहे. याच मतदार संघातून त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे खासदार आहेत. मंत्रीमंडळातून राजीनामा दिल्यानंतर भोसरी जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीला खडसे सामोरे गेले, यातून ते निर्दोष सुटल्याचा त्यांचा दावा आहे.  मात्र शासनातर्फे अद्यापही त्याची घोषणा करण्यात आलेली नाही, याबाबतचे निदोषत्व घोषीत करून पुन्हा मंत्रीमंडळात समावेश करावा अशी त्यांची व पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.

त्यामुळे त्यांनी पक्षावर जाहिरपणे नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांना भाजपतर्फे पुन्हा उमेदवारी दिली जाणार काय? याबाबत संपूर्ण राज्यात उत्सुकता होती. त्यावर गेल्या अनेक दिवसापासून राजकीय तर्कवितर्क लढविले जात होते. 

रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारली तर एकनाथराव खडसे पक्ष सोडून कॉंग्रेस व किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या जागेचा उमेवार घोषित केला जात नाही असेही सांगण्यात येत होते. आता भाजपने रक्षा खडसे यांना अधिकृत उमेदवारी जाहिर केली आहे, त्यामुळे सर्वच तर्कवितर्कावर पडदा पडला आहे. 

मात्र आता रक्षा खडसे यांच्या विरूध्द उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असणार की  कॉंग्रेसचा असणार यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. कॉंग्रेस पक्षातर्फे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील उमेदवारीसाठी इच्छुक आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. कॉंग्रेसने या जागेची मागणी केली आहे. मात्र दोन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी त्याबाबत अधिकृत भूमिका अद्यापही जाहिर केलेली नाही.

 दुसरीकडे राष्ट्रवादीकडेही या जागेसाठी भक्कम असा उमेदवार दृष्टीपथात नाही. त्यामुळे रावेर मतदार संघ कॉंग्रेस की  राष्ट्रवादी कॉंग्रेस लढणार याचीच निश्‍चित होत नसल्यामुळे उमेदवार कोण असणार हे तर अद्यापही दूरच आहे. 

संबंधित लेख