उशिरा येणाऱ्या मंत्र्यांनाही खडसावणारे 'हेडमास्तर'

ज्या ज्यावेळी कॅबिनेट व पक्षाच्या आमदारांच्या बैठका व्हायच्या तेव्हा त्या वेळेवर सुरू व्हाव्यात यासाठी ते चक्क दरवाजे लावून घ्यायला सांगायचे. त्यामुळे उशिरा येणाऱ्या मंत्री व आमदारांना या बैठकीत प्रवेश मिळायचा नाही. ही सवय त्यांनी सगळ्या बैठका व कामकाजातही जपली. त्यामुळे त्यांच्या बैठका वेळेवर सुरू होऊन वेळेत संपायच्या. त्यामुळे त्यांची सबंध महाराष्ट्रात हेडमास्तर अशी ओळख निर्माण झाली.
let shankarrao chavan artical
let shankarrao chavan artical

औरंगाबादः महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते (कै.) शंकरराव चव्हाण यांचा आज जन्मदिन. शंकरराव चव्हाण यांचे नाव घेताच त्यांची कडक अशी प्रतिमा सबंध महाराष्ट्रात उभी राहते. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध महत्वपूर्ण निर्णयांनी महाराष्ट्राच्या प्रगतीला मोठा हातभार लागला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व दुसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात आजच्या महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी त्यांच्या या कार्यकाळाचे कर्तेकरविते होते शंकरराव चव्हाण.

कारण विकासाचा पाया रचणाऱ्या पाटबंधारे, वीज या पायाभूत सुविधांचे मंत्रिपद त्यांनी प्रचंड ताकदीने भूषविले होते. त्यामुळे या क्षेत्राच्या उभारणीत त्यांचे योगदान हे थेट, कृतिशील व आग्रही अशा स्वरूपाचे होते. त्यांच्या या योगदानामुळेच त्यांना 'महाराष्ट्राचा भगीरथ' असे संबोधले जाते. 'भगिरथ' व 'हेडमास्तर' या दोन्ही विशेषणांबरोबरच अनेक गुणांची रास त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती.
 
यंदाचं वर्ष (२०१९ ते २०२०) हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष म्हणून साजरे केले गेले. राज्य सरकारच्या पातळीवरही मुंबईतही ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवराज पाटील चाकूरकर आदींच्या उपस्थितीत एक मोठा समारंभ या निमित्ताने घडवून आणला गेला. तसेच आजही त्यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन मुंबईत होत आहे. त्यांची कर्मभूमी असलेल्या नांदेडलाही गेल्या वर्षभरात त्यांचे चिरंजीव व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने एक समिती स्थापन करून त्यांच्या कार्याचा उजाळा पुन्हा एकदा महाराष्ट्राला करवून देण्यात आला.

मागास अशा मराठवाड्यात जन्माला आलेल्या या नेत्याला आपल्या कर्तृत्वाचा ठसा सबंध राज्य व देशात कसा काय निर्माण करता आला, असा प्रश्न मला पत्रकार व मराठवाड्याच्या प्रश्नांचा अभ्यासक या नात्याने नेहमीच पडायचा. सुदैवाने गेल्या दोन वर्षांत थेट नांदेडलाच काम करायची संधी मिळाल्याने जेवढे जमेल तेवढे शंकरराव आत्मसात करायचा प्रयत्न केला.

शंकररावांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण. पण त्यांची कर्मभूमी नांदेड कशी काय झाली? या गोष्टींविषयीही नेहमी औत्सुक्य वाटायचे. त्यावेळी सबंध मराठवाडा प्रदेश हैदराबाद स्टेट व त्याआधी निजाम राजवटीत होता. त्यामुळे अर्थातच मराठवाड्यातील मुलांचा ओढा शिक्षणासाठी हैदराबादकडे असायचा. त्यातूनच त्यांनी बीए मद्रास विद्यापीठातून तर वकिलीचे शिक्षण (एलएलबी) हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून घेतले.

पुढे मराठवाडा महाराष्ट्रात सामील करण्याच्या व विद्यार्थी, युवक चळवळीत ते कॉंग्रेसच्या प्रवाहात सामील झाले व त्यांच्यावर नांदेड जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. वकिलीपासून त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची सुरूवात झाली. मराठवाडा १९४८ ला महाराष्ट्रात सामील झाला पुढे १९६० ला प्रत्यक्ष महाराष्ट्राची निर्मिती झाली. 

दरम्यानच्या काळात हा प्रदेश बॉम्बे स्टेट असेंम्ब्लीत होता. त्यावेळी १९५७ ला शंकरराव धर्माबादहून बॉम्बे स्टेट असेंम्ब्लीत तर १९६२ ला राज्य स्वतंत्र झाल्यावरच्या पहिल्या निवडणुकीतही ते धर्माबादहून राज्य विधानसभेत गेले. त्याआधी ते नांदेडचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. तसेच १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत त्यांना हदगावमधून पराभवही पत्करावा लागला होता.

पुढे १९६७,१९७२, १९७८ ला ते भोकरहून सातत्याने निवडून येत गेले. लोकसभेत (दोनवेळा १९८० ते १९८६), विधानपरिषद (१९८६), पुढे राज्यसभा (तीन वेळा, १९८८ ते २००२) अशी त्यांची संसदीय कारकीर्द राहिली. या कार्यकाळात त्यांनी दोनवेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद (१९७५ ते १९७७ व १९८६ ते १९८८), देशाचं अर्थमंत्रीपद, दोनवेळा गृहमंत्रीपद तर राज्यसभेत पक्षाचे नेतेपद सांभाळले. ही प्रचंड मोठी राजकीय व सामाजिक कारकीर्द लाभलेल्या या नेत्याच्या गुणांचे अनेक पैलू उलगडत गेले. 

विकासाला चालना देणाऱ्या धरणांची उभारणी..
 
त्यांचे पुत्र अशोकराव यांनी त्यांच्या वडलांचा प्रवास एका मुलाखतीत खूप छान उलगडला आहे. ते म्हणतात.. माझे वडील वक्तशीरपणाबद्दल प्रचंड आग्रही असायचे. त्यांच्या कार्यकाळात देश व राज्याच्या प्रगतीतचे जे निर्णय झाले, त्याने महाराष्ट्रात आमूलाग्र असे परिवर्तन झाले. त्यांना घरी व जवळच्या वर्तुळात 'नाना' असे संबोधले जायचे. त्यांच्या बोलण्यात व वागण्यात अंतर नसायचे. शिस्तप्रिय व वक्तशीरपणाबद्दल ते घरी व कार्यालयातही ओळखले जायचे. त्यांच्या या कडकपणामुळे नातेवाईक व घरचे लोकही दुखावले जायचे पण त्याला नाइलाज असायचा.

नियम म्हणजे नियम, असा त्यांचा आग्रह असायचा. महाराष्ट्राचे सिंचन तसेच देशाच्या एकात्मता, अखंडतेसाठी त्यांनी घेतलेले निर्णय अत्यंत महत्वाचे होते. महाराष्ट्रातील ३१ मोठ्या धरणांपैकी राज्याच्या विकासाला चालना देणाऱ्या जायकवाडी, उजनी, पैनगंगा, काळ, विष्णुपुरी आदि महत्वाच्या धरणांच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. शेतकरी, पिण्याचे पाणी व उद्योग यांचा विचार त्यांनी केंद्रस्थानी मानून या सिंचन प्रकल्पांची उभारणी केली.

केंद्रात गृहमंत्रीपद सांभाळत असताना जम्मू काश्मीर, पंजाब व मिझोरम या प्रदेशांत स्वायत्ततेची मागणी फेटाळून लावत त्यांनी या प्रदेशांना देशाच्या मुख्य धारेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला. एलटीटीवर बंदीचा निर्णय घेतला. तसेच श्रमिकांप्रति त्यांनी कणखर अशी भुमिका घेतली. मुख्यमंत्री असताना गिरणी मालकांनी जमिनी विकण्याची परवानगी मागितली तेव्हा त्यांनी कामगारांच्या हिताचा निर्णय घेतला.

रिकाम्या वेळेत अफाट वाचन, फिरणे, शास्त्रीय संगीत ऐकणे हे त्यांचे मोठे गुण होते. वरून कठोर वाटणारे व दिसणारे नाना आतून तेवढेच मृदू व मुलायम होते. शंकरराव चव्हाण यांचे जावई व नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबतही शंकररावांच्या आठवणी समजून घेण्याची संधी मिळाली. कारण शंकररावांच्या सत्तेवरील वज्रमुठीच्या काळात भास्करराव त्यांच्या अगदी नजीक होते. आज ते भारतीय जनता पक्षात असले तरी त्यांची आजची राजकीय कारकीर्द सासरे शंकररावांनीच घडविली. तेही हे नाकारत नाहीत. शंकररावांविषयी त्यांच्या मनात प्रचंड आदर आहे.

वीस कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी..

शंकररावांना हेडमास्तर का संबोधले जाते, या प्रश्नावर भास्कररावांनी मला जे उत्तर दिले ते भन्नाट होते. ज्या ज्यावेळी कॅबिनेट व पक्षाच्या आमदारांच्या बैठका व्हायच्या तेव्हा त्या वेळेवर सुरू व्हाव्यात यासाठी ते चक्क दरवाजे लावून घ्यायला सांगायचे. त्यामुळे उशिरा येणाऱ्या मंत्री व आमदारांना या बैठकीत प्रवेश मिळायचा नाही. ही सवय त्यांनी सगळ्या बैठका व कामकाजातही जपली. त्यामुळे त्यांच्या बैठका वेळेवर सुरू होऊन वेळेत संपायच्या. त्यामुळे त्यांची सबंध महाराष्ट्रात हेडमास्तर अशी ओळख निर्माण झाली. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडताना त्यांच्याकडे असणाऱ्या अभ्यासू या गुणांचा उल्लेख केला आहे. प्रत्येक मंत्र्याला त्याच्या खात्याची इत्यंभूत माहिती असावी, असा त्यांचा आग्रह असायचा. होयबा व सचिवांवर अवलंबून असणाऱ्या मंत्र्यांना ते खडसावयाचे. इंदिरा गांधींच्या २० कलमी कार्यक्रमाची त्यांनी राज्यात कसून अंमलबजावणी केली. अशा राज्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या‍या व मराठवाड्यात जन्माला आलेल्या या नेत्याची आज जयंती. ज्या ज्या वेळी महाराष्ट्राचे सिंचन, वीज, पाणी, तसेच देशाची एकात्मता हे विषय निघतील त्या त्यावेळी शंकररावांची आठवण निघत राहील, यात शंका नाही.

Edited By: Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com