खतगांवकरांकडून पुतण्याचा पत्ता कट, तर सुनेला बढती..

अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपच्या वतीने कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्यावर भाजपा महिला मोर्चाच्या महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, हे करत असताना खतगावकर यांचे पुतणे रवी पाटील खतगावकर यांना मात्र डावलण्यात आल्याची चर्चा सुरु झाली.
nanded bjp khatgonkar controvercy news
nanded bjp khatgonkar controvercy news

औरंगाबाद- गेल्या दोन महिन्यापासून कोरोना आणि लॉकडाउन सुरु असताना देखील भाजपच्या नांदेडमधील कार्यकारिणीत बदल करण्यात आला आणि नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष भास्कर पाटील खतगावकर यांचे पुतणे रवी पाटील खतगावकर यांचा पत्ता कट करण्यात आला तर सूनबाई डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्यावर महिला आघाडीच्या महानगराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली.

भारतीय जनता पक्षात २०१४ मध्ये नांदेडमधील अनेक दिग्गजांनी प्रवेश केला होता. त्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री ज्येष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाऊजी भास्कर पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर, माजी महापौर सुधाकर पांढरे, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. त्यानंतरही गेल्या पाच वर्षात अनेकांनी भाजपला जवळ केले. त्यात विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, बापूसाहेब देशमुख गोरठेकर, भीमराव केराम यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षात येणाऱ्या वाढत्या संख्येचा २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर खासदार झाले. विधानसभा निवडणुकीत भीमराव केराम (किनवट), राजेश पवार (नायगाव) आणि डॉ. तुषार राठोड (मुखेड) हे तीन आमदार झाले. त्याचबरोबर त्या आधी विधानपरिषदेवर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना आमदार होण्याची संधी मिळाली.

जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी..

भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेता आणि कॉँग्रेस व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपच्या वतीने कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्यावर भाजपा महिला मोर्चाच्या महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, हे करत असताना  खतगावकर यांचे पुतणे रवी पाटील खतगावकर यांना मात्र डावलण्यात आल्याची चर्चा सुरु झाली.

रवी पाटील खतगावकर यांच्याकडे भाजपच्या युवा मोर्चाच्या ग्रामिण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यामुळे पुतण्याला बाजूला ठेऊन सूनबाईंना बढती दिल्याची चर्चा सुरु झाली.
नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने राजेश पवार आणि डॉ. मीनल पाटील खतगावकर हे दोघे प्रबळ दावेदार होते.

त्यामध्ये राजेश पवार यांची सरशी झाली आणि ते आमदार म्हणूनही निवडून आले. त्यानंतर वर्षभरात डॉ. खतगावकर यांना महानगराध्यक्षपदी बढती देण्यात आली. सध्या त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या असून नायगाव तालुक्यातील रामतीर्थ सर्कलमधून निवडून आल्या आहेत. मागील तीन वर्षातील त्यांचा राजकीय कारकिर्दीचा आढावा पाहता त्या ज्येष्ठ नेते खतगावकर यांच्या राजकीय वारसदार म्हणून पुढे येताना दिसून येत आहेत.

दुसरीकडे भाजपच्या युवा मोर्चाच्या ग्रामिण जिल्हाध्यक्षपदी रवी पाटील खतगावकर यांच्याऐवजी किशोर देशमुख यांना संधी देण्यात आली. देशमुख हे देखील नुकतेच भाजपात आले असून अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथील ते आहेत. त्यामुळे भविष्यात आता ते काय कामगिरी करतात हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. 

भाजपच्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी रामचंद्र पाटील बन्नाळीकर यांची तर भोकर विधानसभा अध्यक्षपदी निलेश देशमुख बारडकर यांची निवड करण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पाटील - देशमुख या विषयानंतर भाजपने अनेक देशमुखांना आपल्या पक्षात घेऊन मानाचे स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कार्यकारिणीत देखील अनेक देशमुखांना जवळ करण्यात आल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com