raju todsam mla | Sarkarnama

राजू तोडसाम यांच्यावर यापूर्वीही "तोड'पाण्याचे आरोप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

हंसराज अहीर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्री झाल्याने तोडसाम यांचा "भाव' अचानकपणे वाढला. काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जुने कार्यकर्ते उद्धवराव येरणे यांना आर्णी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले होते. तोडसाम यांनी यावेळी चांगलाच गोंधळ घातला. भाजपचा एबी फॉर्म राजू तोडसाम यांनी पळविल्याचा आरोपही त्यावेळी झाला होता.

नागपूर : आर्णीचे भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी ठेकेदाराला खंडणी मागितल्याच्या प्रकाराची ऑडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. परंतु आमदार तोडसाम यांच्या "तोडपाणी' करण्याच्या सुरस कथा यवतमाळपासून आर्णीपर्यंत गाजत आहेत. 

राजू तोडसाम हे एकेकाळी माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांच्या विश्‍वासातील होते. गोंड समाजातील असलेले तोडसाम यांनी 2009 च्या निवडणुकीत शिवाजीराव मोघे यांना मदत करण्यासाठी निवडणुकीत काम केले होते. आर्णी भागात गोंड समाजाची संख्या लक्षणीय आहे. तोडसाम यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीतही काही काळ काम केले. 2009 नंतर तोडसाम भाजपचे नेते हंसराज अहीर यांच्या संपर्कात आले. 

हंसराज अहीर यांच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2010 मध्ये तोडसाम यांची अहीर यांच्या शिफारशीमुळे भाजपचे आर्णी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. तहसील कार्यालयामध्ये, पोलीस ठाण्यात जाणाऱ्या नागरिकांना अर्ज लिहून देणे, त्यांची प्रशासकीय कामे करून देण्यासाठी मदत करण्याचे काम तोडसाम यांनी सुरू केले. या बदल्यात ते काही पैसेही लोकांकडून घेत होते. 

हंसराज अहीर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्री झाल्याने तोडसाम यांचा "भाव' अचानकपणे वाढला. काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जुने कार्यकर्ते उद्धवराव येरणे यांना आर्णी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले होते. तोडसाम यांनी यावेळी चांगलाच गोंधळ घातला. भाजपचा एबी फॉर्म राजू तोडसाम यांनी पळविल्याचा आरोपही त्यावेळी झाला होता. अखेर येरणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली नाही व तोडसाम यांनी बाजी मारली. 

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तोडसाम यांचे तोडपाण्याचे प्रकार उघडपणे सुरू झाले अशी चर्चा आहे. पोलीस ठाणेदारांना फोन करून महिन्याला हप्ता पाठवा, तहसीलदार व ठेकेदारांना फोन करून धमक्‍या देण्याच्या प्रकाराची या भागात दबक्‍या आवाजात चर्चा सुरू होती. परंतु आतापर्यंत कुणीही तक्रार दिली नव्हती किंवा उघडपणे बोलायला धजले नाही. यवतमाळ येथील ठेकेदार एस. एल. शर्मा यांनी मोबाईल फोनवर झालेले संभाषण टेप करून ऑडीओ व्हायरल केल्याने तोडसाम यांचे पितळ उघडे पडले आहे. 
 

संबंधित लेख