raju shetty vs raju shetty | Sarkarnama

मुंबईकर राजू शेट्टींनी स्वाभिमानीच्या शिट्टय़ा वाजवल्या!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 एप्रिल 2019

शिवसेनेचे धैर्यशील माने उमेदवार आहेत.

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात दुसरा राजू शेट्टी उमदेवार करण्यात आला आहे. वाचून आश्‍चर्य वाटेल पण हे खरे आहे. विरोधकांनी श्री. शेट्टी यांना मिळणारी मते कमी होण्यासाठी ही खेळी खेळल्याचे स्पष्ट झाले आहे. याविरोधात श्री. शेट्टी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे ही दोन्हीही नांवे मतपत्रिकेवर पाठोपाठ आहेत. 

या मतदार संघातून श्री. शेट्टी हे "हॅटट्रीक' च्या तयारीत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने उमेदवार आहेत. एकीकडे दोन टर्मची खासदारकी आणि विरोधात नवखा चेहरा आणि कोरी पाटी अशी ही लढत होत आहे. पण श्री. शेट्टी यांना शह देण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी मुंबईत वास्तव्य असलेल्या राजू मुजिकराव शेट्टी यांचाच अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे नावांत साधर्म्य असलेल्या उमेदवाराला "शिट्टी' हे चिन्ह मिळाले आहे, हेच चिन्ह श्री. शेट्टी यांच्या 2014 च्या निवडणुकीत होते. यावेळच्या निवडणुकीत श्री. शेट्टी यांचे चिन्ह "बॅट' आहे. 

या मुंबईकर शेट्टींमुळे राजू शेट्टी मात्र अस्वस्थ आहेत. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्याकडे तक्रार केली त्या उमेदवाराने रितसर अर्ज भरून अनामत भरली, दहा सुचक त्याच्या अर्जावर आहेत. मतपत्रिकेत श्री. शेट्टी यांचे नांव सात नंबरवर तर मुंबईकर शेट्टीचे नांव सहाव्या क्रमांकावर आहे. रिंगणात 17 उमेदवार असल्याने एकाच बॅलेट मशीनवर ही दोन नांवे आली आहेत. प्रत्यक्ष मतदानात मुंबईकर शेट्टींची कमाल काय होणार ? हे पाहण्यासाठी 23 मेची प्रतिक्षा करावी लागेल.  

संबंधित लेख