raju shetty shetakari saghantana | Sarkarnama

जेलमध्ये जाण्याच्या भितीने विरोधकही शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत - राजू शेट्टी

श्रीकांत पाचकवडे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे तसेच उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळावा यासाठी देशातील 180 शेतकरी संघटनांना एकत्र करून खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात सुरू केलेल्या किसान यात्रेच्या तिसऱ्या टप्यात उत्तर प्रदेशातील लहरपूर-सीतापूर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 

अकोला : या सरकारला केवळ व्होट बॅंकची भाषा समजते. मात्र, देशातील शेतकरी जाती, धर्मात विभागला गेल्याने शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करतेय. आपल्या न्याय-हक्कासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा उभारून शेतकरी हीच आमची जात असल्याचे दाखवा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

भाजप सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्यामुळे आम्ही एनडीएतून बाहेर पडलो व रस्त्यावर उतरलो. मात्र विरोधी पक्ष असणाऱ्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. कारण मागच्या काळातील त्यांची काळे धंदे सरकार उघडकीस आणील व त्यांना जेलमध्ये टाकतील, म्हणून ते शेतकऱ्यांसाठी फार काही करतील ही अपेक्षा कुणीही ठेऊ नये. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या पोरांनी एकत्र येऊन सरकारला खाली खेचण्यासाठी सर्व प्रकारच्या लढाईसाठी सज्ज होणे आवश्‍यक आहे. 20 नोव्हेंबरला दिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार होणार असल्याचे खासदार शेट्टी म्हणाले. 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे तसेच उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळावा यासाठी देशातील 180 शेतकरी संघटनांना एकत्र करून खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात सुरू केलेल्या किसान यात्रेच्या तिसऱ्या टप्यात उत्तर प्रदेशातील लहरपूर-सीतापूर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 

यावेळी शेतकरी नेते व्ही. एम. सिंग, राजस्थानचे शेतकरी नेते रामपाल जाट, व्ही. एम. सिंग, बापू कारंडे, प्रल्हाद इंगोले, जगदीश इनामदार, मयुर बोरडे, प्रशांत सोनावणे, रवी उंडाळे, अमोल हिप्परगे, बबलू शेख उपस्थित होते. यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची ताकद विरोधी पक्षात नाही. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनाच रस्त्यावर यावे लागेल. मात्र देशातील शेतकरी जाती, धर्म, भाषा, प्रांतात विभागला गेल्याने सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परंतु आता सर्वांनी एकजुटीने लढा उभारून आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी सरकार झुकविण्याची वेळ आली आहे. 

ते पुढे म्हणाले , सत्ताधाऱ्यांना वाटते शेतकरी काहीच करू शकत नाही. पण आता शेतकऱ्यांची ताकद दाखवुन देऊ. सरकारकडे किती दिवस भिक मागणार, किती जण झाडावर लटकून आत्महत्या करणार, किती दिवस असे लाचारीने जगणार हे आता थांबले पाहिजे. आम्हाला भिक नकोय, हक्क हवा आहे. आणि हा हक्क लढूनच मिळणार आहे. 

संबंधित लेख