Raju Shetty Says Subhash Deshmukh is Dacoit | Sarkarnama

सहकार मंत्री सुभाष देशमुख दरोडेखोर ; खासदार राजू शेट्टींचा घणाघात

भारत नागणे
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

मंगळवारी रात्री खासदार शेट्टींच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथे ऊस परिषद झाली. त्यावेळी खासदार शेट्टींनी सहकारमंत्री आणि भाजप सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी रविकांत तुपकर यांनी सरकारी अधिकारी व साखर कारखानदारांचे हातपाय कलम करा, असे वादग्रस्त वक्तव्य केले.

पंढरपूर : "सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे अजूनही सुमारे 49 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तरीही जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे.अशा कारखान्यांना राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा आशिर्वाद आहे. बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या कारखान्यांना संरक्षण देण्याचे पाप ते करताहेत. कुठं फेडाल हे पाप सुभाषराव?" असा घणाघात करत सहकारमंत्री हेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे दरोडेखोर आहेत, असा गंभीर आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरातील ऊस परिषदेत बोलताना केला.

मंगळवारी रात्री खासदार शेट्टींच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथे ऊस परिषद झाली. त्यावेळी खासदार शेट्टींनी सहकारमंत्री आणि भाजप सरकारवर चौफेर टीका केली. खासदार शेट्टी म्हणाले, ''ऊस परिषदेला येण्यापूर्वी मी साखर आयुक्त कार्यालयाकडून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची माहिती घेतली. त्यामध्ये लोकमंगलकडे शून्य बाकी असल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. आज मी लोकमंगल कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या उदगावला गेलो होते. तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितले की, मागील हंगामातील आमचे पैसे अजून मिळाले नाहीत. म्हणजे सहकारमंत्र्यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे." 

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सहकारमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, नाहीतर यामध्ये मुख्यमंत्र्यांचीही टक्केवारी आहे असे समजावे लागेल, असेही प्रतिपादन खासदार शेट्टींनी केले. यावेळी रविकांत तुपकर यांनी सरकारी अधिकारी व साखर कारखानदारांचे हातपाय कलम करा, असे वादग्रस्त वक्तव्य केले.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसा - सरकारनामा दिवाळी अंक - आजच सवलतीच्या दरात मागणी नोंदवा - अॅमेझाॅनवरुन अंकाची मागणी नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख