raju shetty meet sharad pawar in kolhapur | Sarkarnama

शरद पवारांनी राजू शेटटींचे निमंत्रण स्विकारले 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

या आंदोलनात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेतच.

कोल्हापूर : शेतमालाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी किसान संघर्ष समितीने 30 नोव्हेंबरला संसदेला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना निमंत्रण दिले असल्याचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेटटी यांनी सांगितले. 

कोल्हापूर येथील सर्किट हाउस येथे पवार-शेटटी यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. 

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने 29 व 30 नोव्हेंबरला संसदेला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज खासदार शेटटी यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांची कोल्हापूर येथील सर्किट हाउस येथे भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय, साखर उद्योगातील अडचणी, एफआरपीचा बेस रेट बदलल्याने शेतकऱ्यांचा होत असलेला तोटा आदी विषयावर चर्चा झाली. यावेळी दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन खासदार शेटटी यांनी पवार यांना केले. 

यावेळी बोलताना खासदार शेटटी म्हणाले, संसदेला घेराव घालण्याचे निमंत्रण खासदार पवार यांनी स्विकारले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेतच. मात्र विविध राजकीय पक्ष व संघटनांनाही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खासदार पवार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.  

संबंधित लेख