Raju Shetty Jet Airways | Sarkarnama

'बोर्डिंग पास' असतानाही जेट एअरवेज विसरले राजू शेट्टींना

ब्रह्मा चट्टे
बुधवार, 14 जून 2017

बोर्डिंग पास घेतलेला असतानाही असे विसरून जाणे, हा विमान कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे मी निदर्शनास आणून दिले. मात्र, जेट एअरवेज कंपनीने सरळ हात वर केले- राजू शेट्टी

मुंबई- खासदार राजू शेट्टी आज मुंबईहून दिल्लीला निघाले होते. त्यासाठी त्यांनी मुंबई विमानतळावर 'बोर्डिंग पास' घेतला असताना त्यांना घेऊन जाण्यास जेट एयरवेज विसरले. त्यानंतर अरेरावी करत जेटएयरवेअजच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला मन:स्ताप दिल्याने तक्रार करणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी 'सरकारनामा'ला दिली.

खासदार शेट्टी म्हणाले, ''मी आज मुंबई विमानतळ येथे सकाळी ६.०० वाजताच्या विमानाचे दिल्ली येथे जाण्यासाठी बिझनेस क्लासचे टिकिट घेतले व तास भर आधी विमानतळावर पोहोचलो. रितसर बोर्डिंग पास घेतला व वेळ होता म्हणून लाउंज मधे बसलो होतो. त्यावेळी रजिस्टर मधे नोंद देखील मी केली. काही वेळाने मी बोर्डिंग करता लॉन्जच्या बाहेर आलो असता, बोर्डिंगचा दरवाजा बंद झाल्याचे मला कळवण्यात आले. बोर्डिंग पास घेतलेला असतानाही असे विसरून जाणे, हा विमान कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे मी निदर्शनास आणून दिले. मात्र, जेट एअरवेज कंपनीने सरळ हात वर केले.''

ते पुढे म्हणाले, ''मला दिल्लीला बैठकीसाठी करता जाणे जरूरी असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानंतर सकाळी ७.०० वाजताच्या विमानाचे बदली तिकीट दिले. मात्र, या करता २००० रूपये वसुल केले. माझी चूक नसल्याने मी पैसे भरण्यास नकार दिला असता जेट एयरवेज ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी कार्डद्वारे मी पैसे दिले व त्याची पावती मागितली असता कंपनीने मला पावतीही दिली नाही.'' आपली चूक नसताना झालेल्या मन:स्तापाबद्दल 'एयरपोर्ट अॅथाॅरिटी' कडे तक्रार करणार आल्याचेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, विमानतळावरील अधिकारी व शिवसेना खासदार रवी गायकवाड यांच्या भांडणाचे प्रकरण ताजे असतानाच आता खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होते हे पहावे लागेल. खासदार राजू शेट्टी कधीही 'प्रोटोकॉल' घेत नाहीत, तसेच मदतनीस देखील घेत नाहीत. त्यामुळेच त्यांना हा नाहक मन:स्ताप सहन करावा लागला असल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी दिली.

संबंधित लेख