Raju shetty asks Tupkar & Mohite to start preparations for loksabha elections | Sarkarnama

राजू शेट्टींनी तुपकर - मोहितेंना सांगितले ,कामाला लागा .. 

अरूण जैन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

आपण मित्रपक्षांकडून सहा जागांची मागणी करू मात्र बुलडाणा आंणि वर्धा बाबत तडजोड करणार नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

बुलडाणा: समविचारी पक्षांबरोबर  आघाडी करून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे आमचे धोरण आहे, मात्र आमची ताकद असलेल्या बुलडाणा आणि वर्धा या जागा आम्ही सोडणार नाही, असा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी  'सरकारनामाशी' बोलताना व्यक्त केला.

 वर्धा येथे  बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली आणि  कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी वर्धा लोकसभेसाठी माजी मंत्री सुबोध मोहिते यांना तर बुलडाण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात सरकारनामाशी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, " आमच्या विचारांशी व धोरणाशी मिळत्याजुळत्या पक्षासोबत आघाडी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तशी बोलणीदेखिल सुरू आहे. बुलडाणा आणि वर्धा वगळता इतर जागांवर तडजोड करता येईल. रविकांत तुपकरांनी विदर्भातील इतर जिल्ह्यासोबतच बुलडाण्यात पक्षाचे चांगले नेटवर्क उभे केले आहे. तर वर्धा लोकसभेसाठी सुबोध मोहिते दमदार उमेदवार आहेत. " 

आपण मित्रपक्षांकडून सहा जागांची मागणी करू मात्र बुलडाणा आंणि वर्धा बाबत तडजोड करणार नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

हातकणंगले , कोल्हापूर , सांगली,  माढा , बुलढाणा , वर्धा आणि नंदुरबार या सात लोकसभेच्या जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उभे करणार असल्याचे राजू शेट्टी जाहीर सभातून बोलत आहेत .  हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या जागांबाबत ते जास्त आग्रही दिसत आहेत . 

 

संबंधित लेख