Raju Shetty asks government to pay dues to milk federation | Sarkarnama

दूध संघाच्या २२५ कोटींच्या अनुदानाचं मिटवा, अन्यथा रस्त्यावर :  खा. राजू शेट्टींचा इशारा

अमोल कविटकर 
शनिवार, 8 डिसेंबर 2018

अनेक संघांना केवळ ऑगस्टचे अनुदान मिळाले असून काही दूध संघांना सप्टेंबर महिन्याचे निम्मे अनुदान मिळाले. त्यामुळे गेल्या महिन्यापर्यंत २२५ कोटींची थकबाकी शासनाकडे थकीत आहे. 

पुणे : "स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर एक ऑगस्टपासून दूध उत्पादकांना लिटरमागे ५ रुपये अनुदानाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला खरा, मात्र प्रत्यक्षात केवळ पहिल्याच म्हणजे ऑगस्ट महिन्यांचे पूर्ण अनुदान दूध संघांना मिळाले. तर दुसरीकडे अनुदान मिळत नसल्याने दूध संघांनी शेतकऱ्यांना वीस रुपयांनी दर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे दूध संघांचं २२५ कोटींचे अनुदान तातडीने द्या, अन्यथा आंदोलन करु," असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे.

खा. शेट्टी आंदोलनाचा इशारा देत म्हणाले, "दूध संघांना अनुदान देण्याबाबत राज्य सरकार चालढकल करत असून अनेक संघांना केवळ ऑगस्टचे अनुदान मिळाले असून काही दूध संघांना सप्टेंबर महिन्याचे निम्मे अनुदान मिळाले. त्यामुळे गेल्या महिन्यापर्यंत २२५ कोटींची थकबाकी शासनाकडे थकीत आहे".

सहकारी आणि खासगी दूध संघांची बैठक नुकतीच पुण्यात पार पडली होती. या बैठकीत अनुदान ११ डिसेंबरपर्यंत दिले गेले तरच या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जर अनुदान मिळाले नाही, तर दूध उत्पादकांना वीस रुपये प्रतिलिटर दर मिळणार हे निश्चित आहे.

" राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी करताना कारवाई सुरु करताना दूध पिशवी उत्पादकांवरही कारवाई सुरु केल्याने दूध पिशव्यांचे उत्पादन १५ डिसेंबरपर्यंतच सुरु राहणार आहे. त्यानंतर दूध वितरण कसे करायचे हा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीतून दूध पिशव्यांना शिथिल करावे," मागणी शेट्टी यांची आहे.

" एकीकडे राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. शिवाय आताच्या घडीला दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून बाहेरील राज्यातील दूधही उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत जर आंदोलन केले तर ते परवडणारे नाही. त्यामुळे आता आंदोलन कसे करायचे?", हा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.

संबंधित लेख