raju shetty about sachin tendulkar | Sarkarnama

सचिन तेंडूलकरने धावा किती काढल्या व किती मॅचफिक्‍सिंग केले ?: राजू शेट्टी 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

पेट्रोल पंपावर तेल भरणाऱ्या मुलाला केंद्र सरकार पद्मश्री देते.

रेठरे बुद्रुक (सातारा) : भलत्या, सलत्यांचा सन्मान केला जातो. सचिन तेंडूलकरने धावा किती काढल्या व किती मॅचफिक्‍सिंग केले, हे न पाहता त्याला भारतरत्न दिला जातो. पण ऑलंपिकमध्ये अनवाणी जाऊन देशाची मान ताठ करणाऱ्या खाशाबा जाधव यांची पद्मभूषणपासून उपेक्षा का, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला.

गोळेश्वर (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथे महाराष्ट्र लीग कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या यशवंत सातारा संघास चिंतन समारंभ झाला. यामध्ये खासदार शेट्टी बोलत होते. पुरुषोत्तम जाधव, पैलवान संतोष वेताळ, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, धनाजी शिंदे, सावकार मादनाईक, विठ्ठल मोरे, रणजीत जाधव, सुदाम चव्हाण, अनिल घराळ, सरपंच राणी जाधव, उपसरपंच प्रदिप जाधव उपस्थित होते. 

खासदार शेट्टी म्हणाले, खाशाबा जाधवांचा सन्मान करण्यात केंद्र व राज्य सरकार कमी पडले आहे. भलत्या, सलत्यांचा सन्मान केला जातो. सचिन तेंडूलकरने धावा किती काढल्या व किती मॅचफिक्‍सिंग केले, हे न पाहता त्याला भारतरत्न दिला जातो. खाशाबा जाधव तेंडूलकरपेक्षा तसूभरसुध्दा कमी नव्हते. खेड्यातील होते म्हणून त्यांना का दुर्लक्षित केले, असा सामान्याच्या मनामध्ये प्रश्न आहे. खाशाबा जाधवांना पद्मभूषण मिळवण्यासाठी दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहे. कॉंग्रेसच्या काळात तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरंम यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी दोन ओळीच्या पत्रात सांगितले की, हयात नसणाऱ्या व्यक्तीस असला पुरस्कार दिला जात नाही. धीरुभाई अंबानींना हयात नसताना 12 वर्षानंतर पुरस्कार दिला. सरकारचे धोरण बदलल्यानंतर याकामी पंतप्रधानांकडे पाठपुरावा केला. तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शासन दरबारी खाशाबा जाधवांच्या सन्मानासाठी लढाई सुरु ठेवणार आहे. 

पेट्रोल पंपावर तेल भरणाऱ्या मुलाला केंद्र सरकार पद्मश्री देते. सचिन तेंडूलकरला भारतरत्न मिळावा, यासाठी मागण्यांचा रेटा उभा राहतो. पण ऑलंपिकमध्ये अनवाणी जाऊन देशाची मान ताठ करणाऱ्या खाशाबा जाधव यांची पद्मभूषणपासून उपेक्षा का, असा सवाल करत जनसामान्यांची भाषा राज्यकर्त्यांना समजत नसेल, तर त्यांच्या मानगुठीला धरुन खाशाबा जाधवांना पद्मभूषण देण्यास भाग पाडू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

संबंधित लेख