raju shetty about ravikant tupkar and anil pawar | Sarkarnama

तुपकरांनी बुलडाणा मान्य केला तर अनिल पवार माढ्याचे उमेदवार : शेट्टी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018


संपूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव ही दोन विधेयके आम्ही लोकसभेत मांडली आहेत. जो पक्ष किंवा आघाडी त्यांचे सरकार सत्तेवर आल्यावर या विधेयकांना मंजूरी देण्याची हमी देतील, त्यांच्यासोबत आम्ही आघाडी, युतीबाबत विचार करू.

-राजू शेट्टी, खासदार 

सातारा : स्वाभिमान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर यांच्यापुढे माढा किंवा बुलडाणा असे दोन पर्याय असतील. त्यांनी बुलडाणा मान्य केला तर माढातून आमच्या संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार यांना संधी दिली जाईल, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. 

कोल्हापूरकडे जाताना खासदार राजू शेट्टी आज दुपारी सातारा शासकिय विश्रामगृहात थोडावेळ थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना यावेळेस लोकसभेच्या 48 पैकी सहा जागा लढणार आहे. यामध्ये इचलकरंजी, हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, धुळे आणि माढा मतदारसंघाचा समावेश आहे. साताऱ्यातून निवडक लढण्याइतपत आमची संघटना मोठी नाही. 

आगामी निवडणुकीत एखाद्या पक्षासोबत आघाडी करताना तुमच्या नेमक्‍या अटी काय असतील, असे विचारले असता खासदार शेट्टी म्हणाले, संपूर्ण कर्जमुक्ती मिळण्याचा अधिकार आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळण्याचा अधिकार ही दोन विधेयक मी लोकसभेत मांडली आहेत. त्यांना 22 राजकिय पक्षांनी पाठींबा दिला आहे. जो पक्ष व आघाडी आमचे सरकार सत्तेवर आल्यावर ही दोन विधेयके त्यांच्या सरकारमार्फत लोकसभेत मांडून मंजूर करून देण्याची हमी देतील, त्यांच्याविषयी आम्ही आघाडी, युतीबाबत विचार करू. पण यामध्ये भाजप अगदी शेवटच्या क्रमांकावर असेल, त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख