raju shetti on maharashtra police | Sarkarnama

"दुकानदारी थांबवा, अन्यथा पोलिस बंड करतील!'; शेट्टींचा इशारा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जून 2017

शेतकरी संपला तर आम्हा पोलिसांचा मूक संपूर्ण पाठिंबा आहे. कारण आज संप करणारे आमचे मायबाप आहेत आणि उद्या बंड करणारी आम्ही शेतकऱ्यांची पोलीस पोरं आहोत. त्यामुळे एवढेच लक्षात राहू द्या', अशी फेसबुक पोस्ट एका पोलिसाने केल्याचा संदर्भ शेट्टी यांनी दिला आहे.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस कुमक वापरुन शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याची भूमिका घेतल्यानंतर शेतकरी नेते, खासदार राजू शेट्टी यांनी पोलिसांच्या समस्यांना हात घातला आहे. पोलिस बदल्यांत होत असलेला भ्रष्टाचार, पोलिसांचे खालावलेले आरोग्य, होत असलेली अप्रतिष्ठा यामुळे पोलिस दलाचे खच्चीकरण होत असून हे थांबविले नाही तर एकदिवस ते बंड करतील, असा इशारा त्यांनी फडणवीसांना दिला आहे. 

"फडणवीस साहेब, पोलिसांचा संयम संपत आहे,' या आशयाचे पत्र शेट्टी यांनी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शेतकरी संपावर जाईल याचा स्वप्नातसुद्धा विचार कोणी केला नसेल. कारण तो असंघटीत आहे, असे समजून सर्वजण बळीराजाला गृहीत धरत होते. पण कालचक्र कठोर असते, आणि परिस्थिती विलक्षण ताकतवर असते. असेच पोलिसाबाबत सुद्धा म्हणावे लागेल. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र पोलिसांचेसुद्धा असेच खच्चीकरण चालू आहे. राजकीय हस्तक्षेप, न्यायालयाची नकारात्मकता, राज्यकर्त्यांची उदासीनता यामुळे पोलिसांचा संयम सुटत चालला आहे. आपल्याला कोणी वाली नाही ही भावना व्यक्तीला व्यवस्थेविरुद्ध संघटित व्हायला व बंड करण्यास प्रवृत्त करते, याचे शेतकरी संपाचे ठळक उदाहरण समोर आहे. ही असुरक्षितता फक्त हवालदार, शिपाई यांच्यात आहे असे नाही तर आयपीएस ते पीएसआयपर्यंत सुद्धा अमर्याद असंतोष सर्व पोलीसांत आहे. 

काही दिवसांपूर्वी तत्कालीन महासंचालक प्रवीण दीक्षित एके ठिकाणी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सूटमध्ये कोपऱ्यात उभे असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. जर आपला सेनापतीच गर्भगळीत असेल तर फौज पाठीमागे कितीकाळ उभी राहील ? आज तुम्ही खोकी आधारित चालवलेले बदली धोरण खाकीला काळीमा फासत आहे. फौजदाराच्या बदलीसाठी पाच लाख आणि जिल्हा पाहिजे असल्यास एसपी कडून दोन कोटी खंडणी स्वरूपात घेतले जात असतील तर खालील कर्मचाऱ्यांकडून दरोडे टाकण्यापलीकडे कोणती अपेक्षा आपण करत आहात? आज एका पोलिस ठाण्याकडून हजारापासून लाखापर्यंत महिन्याला हप्ते दिले जातात व इतर वरकमाई वेगळीच हे त्रिवार सत्य नाकारून चालणार नाही. आपण स्वतः घडी डिटर्जंट छाप स्वछ प्रतिमेचे आहात, तर मग हप्ते घेण्याची परवानगी आपण ज्यांना दिली आहे त्यांना आवरा कारण आपण गृहमंत्रीसुद्धा आहात. शेतकरी गळफास घेऊन जीवन संपवत आहे, अन पोलीस ताणतणावातून डायबेटीस, शुगर आणि ब्लड प्रेशरने हळूहळू मरत आहेत, एवढाच तो काय फरक आहे. पण हे सर्वकाळ चालू शकत नाही, हे आता शेतकरी संपावरून लक्षात आले असेल. 

वर्षानुवर्षे पोलिसांची स्वतंत्र वेतन आयोगाची मागणी असेल किंवा किमान महसूलसारखी वेतन श्रेणी मागणीचा वेळीच विचार झाला पाहिजे. विधिमंडळात पोलिसांना नागरिक समजून प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. त्याकरिता शिक्षक,पदवीधर मतदार संघाच्या धर्तीवर व्यवस्थात्मक बदल केला गेला पाहिजे. बदली अधिनियमाची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. बदलीमधील राजकीय हस्तक्षेप पूर्ण थांबवला पाहिजे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय, आरोग्याची व निवासस्थानाच्या समस्यांची गांभीर्याने सोडवणूक झाली पाहिजे. आशा अजूनही बऱ्याच समस्या आहेत. यात आताच लक्ष दिले नाही तर कदाचित ते कायद्याच्या दडपणामुळे संप करणार नाहीत, पण हातात बंदुका असल्याने संपाऐवजी थेट बंडच करतील! 

ज्या पोलिसांच्या बळावर शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचे स्वप्न रंगवत आहात. त्या पोलिसांच्या मनात देवेंद्रजी तुमच्या खात्याबद्दल किती आदर आहे, हे एखदा तपासा. वेळीच यात दुरूस्त्या करा नाहीतर अजून एका बंडाला सामोरे जावे लागेल. आणि एक विचारायच राहूनच गेलं, बदल्याची दुकानदारी चालतेच की... मला वाटलं कर्मचाऱ्यांच्या सोयीने व मेरीटवर बदल्या होत असतील..! कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र माझा ? , असे शेट्टी यांनी शेवटी म्हटले आहे. 

संबंधित लेख