raju shetti | Sarkarnama

राजू शेट्टी आणि खोत यांच्यातच पुढची लढत ?

निवास चौगुले
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कोल्हापूर : ऊस दराच्या प्रश्‍नावरून साखर सम्राटांबरोबरच सरकारलाही सळो की पळो करून सोडलेले खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरले जाण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर : ऊस दराच्या प्रश्‍नावरून साखर सम्राटांबरोबरच सरकारलाही सळो की पळो करून सोडलेले खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरले जाण्याची शक्‍यता आहे. 
राज्यमंत्री झाल्यानंतर श्री. खोत यांचा "स्वाभिमानी' शी तुटलेला संपर्क, त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेली मैत्री, त्यातून श्री. शेट्टी यांच्याशी झालेले मतभेद व मंत्रिपदाची झूल पांघरल्यानंतर मूळ शेतकरी व त्यांच्या प्रश्‍नापासून तुटलेली नाळ याचाच फायदा उठवत भारतीय जनता पार्टीकडून श्री. खोत यांना श्री. शेट्टी यांच्या विरोधातच रिंगणात उतरले जाईल अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. सद्य राजकीय परिस्थितीत श्री. खोत कधीही भाजपत प्रवेश करतील असे चित्र आहे. श्री. शेट्टी यांच्याशी त्यांचे केवळ मतभेदच निर्माण झालेले नाहीत तर त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संभाषणही झालेले नाही. श्री. शेट्टी यांनी दोन दिवसापूर्वीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 4 मे रोजी कोल्हापुरात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. याबाबतही श्री. खोत यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. 
हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे श्री. शेट्टी दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत. पहिल्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन निवेदिता माने यांचा लाखाच्या मतांनी पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसच्या समझोत्यात हा मतदार संघ कॉंग्रेसला गेला. कॉंग्रेसकडून माजी खासदार कल्लाप्पा आवाडे रिंगणात उतरले, पण त्यांचाही मोठ्या फरकांनी पराभव झाला. दोन निवडणुकीतील मोठ्या विजयाने श्री. शेट्टी हेही हवेत असल्यासारखी स्थिती आहे. पूर्वी दोन्ही कॉंग्रेससोबत असलेले श्री. शेट्टी आता भाजपसोबत आहेत. पण ऊस दर, शेतकरी कर्जमाफी या प्रश्‍नावरून त्यांचे सरकार सोबत बिनसले आहे. त्यात श्री. खोत यांना मंत्री पद दिल्याने ते संतप्त आहेत. केंद्रात स्वतःला मंत्री पद मिळावे यासाठी ते प्रयत्न करत होते, पण भाजपने श्री. खोत यांना राज्यात मंत्री पद देऊन श्री. शेट्टी यांच्याच जखमेवर मीठ चोळले आहे. 
आता लोकसभेत श्री. खोत यांनाच श्री. शेट्टी यांच्याविरोधात उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामागे जातीचे राजकारणही मोठे आहे. जैन विरोधात मराठा असा सामना झाला तर त्याचा फायदा श्री. खोत यांना होऊ शकतो हेही गणित यामागे आहे. या मतदार संघातील शिरोळ व हातकणंगले वगळता इतर चार विधानसभा मतदार संघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्याचा फायदा श्री. खोत यांना होऊ शकतो अशीही राजकीय खेळी आहे. श्री. खोत यांना मंत्री पद, त्यानंतर त्यांच्या खात्यात केलेली वाढ हे सर्व पाहता श्री. शेट्टी यांचे खच्चीकरण यापूर्वीच भाजपने केले आहे. दोन्ही कॉंग्रेसचाही श्री. शेट्टी यांच्यावर राग आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तोही काढण्याची संधी कॉंग्रेसवाले सोडणार नाहीत. लोकसभेला अजून दोन वर्षाचा अवधी आहे, तोपर्यंत राजकीय स्थित्यंतरे काय होतील, कोण कोणासोबत असेल यावरच या सर्व घडामोडी अवलंबून आहेत. 

संबंधित लेख