Rajmata Jijau Masaheb and Samrudhhi expressway naming issue | Sarkarnama

समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या 

राजेभाऊ मोगल 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

हा द्रुतगती महामार्ग वेरूळ (जि. औरंगाबाद), सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) म्हणजे जिजाऊ मॉ साहेबांच्या सासर आणि माहेराजवळून जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे.

-अभिजित देशमुख

औरंगाबाद :  " नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग उभारण्यात येत आहे. हा द्रुतगती महामार्ग वेरूळ (जि. औरंगाबाद), सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) म्हणजे जिजाऊ मॉ साहेबांच्या सासर आणि माहेराजवळून जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे," अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या या समृद्धी महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. या महामार्गाला नाव देण्याच्या अनेक मागण्या समोर येत आहेत. मात्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी समोर आली आहे. 

याबाबत श्री. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, " सिंदखेडराजा येथील लखोजीराव जाधव यांच्या कन्या असलेल्या राजमाता जिजाऊ वेरूळला शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी म्हणून नांदायला आल्या. या महामार्गाला राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळख प्राप्त झाल्यास या महामार्गालाही एक भूषण प्राप्त होईल. खरे तर राजमाता जिजाऊ यांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राला समृद्धी लाभत नाही. मग समृद्धी महामार्ग त्यांच्या नावा शिवाय कसा होईल? "

" जिजाऊ तर विदर्भ-मराठवाडा-पश्‍चिम महाराष्ट्र-कोकण-मुंबई यांना जोडणारा एक ऐतिहासिक दुवा आहे. यासंदर्भाने हा महामार्ग राजमाता जिजाऊ यांच्याच नावाने होणे अधिक महत्त्वाचे आणि संदर्भयुक्त वाटते. ज्या गौरवशाली इतिहासाचा महाराष्ट्राला आणि देशाला सार्थ अभिमान वाटतो, त्या परंपरेचे स्मरण यानिमित्ताने सदैव होत राहील. महाराष्ट्राच्या लौकिकात भर टाकण्याची ही फार मोलाची संधी आहे," असेही श्री .देशमुख म्हणाले .  

महाराष्ट्राचे मन, मनगट आणि मणका समृद्ध करणाऱ्या राजमाता जिजाऊ मॉ साहेबांचे नाव या महामार्गाला दिल्यास महिलांच्या विषयी असलेल्या सन्मानाचे एक उदाहरण जगासमोर जाईल आणि महत्त्वाचे म्हणजे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ऊर अभिमानाने भरून येईल, असेही त्यांनी  म्हटले आहे. 

संबंधित लेख