Rajiv Satav Says Subhash Bhamre is not speaking truth | Sarkarnama

संरक्षण राज्‍यमंत्री डॉ. सुभाष भांबरे खोटे बोलत आहेत : राजीव सातव 

मंगेश शेवाळकर
बुधवार, 26 डिसेंबर 2018

राफेल प्रकरणात भाजपकडून काँग्रेसवर विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. त्‍यासाठी भाजप प्रवक्‍त्‍यांकडून पत्रकार परिषद देखील घेतली जात आहे. मात्र भाजपच्‍या प्रवक्‍त्‍यांनी अभ्यास करूनच या प्रकरणावर बोलले पाहिजे.

राजीव सातव 

हिंगोली:  राफेल प्रकरणामध्ये विमानांची वाढलेली किंमत केंद्र शासनाने मागील दोन वर्षात का सांगितली नाही असा सवाल करत संरक्षण मंत्री किंवा राज्‍यमंत्री राफेल प्रकरणात खोटे बोलत असल्‍याचा आरोप केंद्रीय संरक्षण समितीचे माजी सदस्य तथा काँग्रेसचे खासदार  राजीव सातव यांनी बुधवारी (ता.२६) पत्रकार परिषदेत केला आहे.

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये श्री .सातव यांच्‍या उपस्‍थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी माजीमंत्री डी.पी. सावंत, आमदार डॉ. संतोष टारफे, जकी कुरेशी, नगरसेवक अनिल नेनवाणी, केशव नाईक, सुरेश सराफ उपस्‍थित होते.

यावेळी खासदार श्री .सातव म्‍हणाले की, "राफेल प्रकरणाबाबत भाजपकडून खोटा प्रचार केला जात आहे. या संदर्भात  १८ नोव्‍हेंबर २०१६ रोजी लोकसभेत प्रश्न उपस्‍थित केला होता. यामध्ये भारत सरकारचा फ्रान्स सरकारसोबत राफेल विमान खरेदीचा करार झाला का? याची माहिती विचारण्यात आली होती. त्‍यानंतर संरक्षण राज्‍यमंत्री डॉ. सुभाष भांबरे यांनी ता. २३ सप्‍टेंबर २०१६ रोजी विमान खरेदीबाबत करार झाल्‍याचे सांगितले. यामध्ये छत्तीस विमान खरेदी करण्याचे ठरवण्यात आले असून एका विमानाची किंमत अंदाजे ६७० कोटी रुपये असल्‍याचे लेखी उत्तरात सांगितले होते ."

" मात्र मागील दोन वर्षात असा कोणता बदल झाला, ज्‍यामध्ये विमानाची किंमत ६७० कोटी रुपयावरून सोळाशे कोटी रुपयापर्यंत पोहोचली याचे उत्तर केंद्र शासनाने दिले पाहिजे. मागील दोन वर्षात वेळोवेळी विचारणा केल्‍यानंतरही या विमानाची किंमत का सांगितली जात नाही ?"असा सवालही त्‍यांनी यावेळी  उपस्‍थित केला. या प्रकरणामध्ये संरक्षणमंत्री किंवा संरक्षण राज्‍यमंत्री यांच्‍यापैकी एकजण नक्‍कीच खोटे बोलत असल्‍याचा आरोप खासदार सातव यांनी यावेळी केला आहे.

" राफेल प्रकरणाच्‍या चौकशीसाठी संयुक्‍त सांसदीय समिती नियुक्‍त करून या समितीमार्फत चौकशी केली पाहिजे. या चौकशीमधून सर्व सत्‍य बाहेर पडेल असेही खासदार  सातव यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस सरकारच्‍या काळात झालेल्‍या विविध खरेदीची माहिती लोकसभेच्‍या पटलावर ठेवली आहे. मात्र आता केंद्र सरकारने राफेल प्रकरणाची सविस्‍तर माहिती लोकसभेच्‍या पटलावर ठेवली पाहिजे . राफेल प्रकरणात मोठी अनियमितता केंद्रसरकार दडवू पाहत असल्‍याचा आरोप श्री  सातव यांनी यावेळी केला.

 

संबंधित लेख