rajesh tope and election | Sarkarnama

राजेश टोपे यांच्या मतदारसंघातील 21 हजार मतदारांच्या नावांवर आक्षेप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

घनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये तब्बल एकवीस हजार नावे बोगस असल्याचा आक्षेप तहसील कार्यालयात नोंदवण्यात आल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजीमंत्री राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश टोपे हे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये घनसावंगी तालुका, अंबड तालुक्‍यातील चार महसूल विभाग, जालना तालुक्‍यातील 42 गावांचा समावेश होतो. या मतदारसंघातील मतदार मुंबई, औरंगाबादसह विविध भागात कामानिम्मीत वास्तव्यास राहतात.

घनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये तब्बल एकवीस हजार नावे बोगस असल्याचा आक्षेप तहसील कार्यालयात नोंदवण्यात आल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजीमंत्री राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश टोपे हे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये घनसावंगी तालुका, अंबड तालुक्‍यातील चार महसूल विभाग, जालना तालुक्‍यातील 42 गावांचा समावेश होतो. या मतदारसंघातील मतदार मुंबई, औरंगाबादसह विविध भागात कामानिम्मीत वास्तव्यास राहतात. तर याच भागात नोकरी करणारे मात्र अंबड, जालना, औरंगाबाद येथे वास्तव्य करीत असलेले व नोकरी करून दुसऱ्या भागात वास्तव्यास गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची नावे मतदार यादीत असल्याचे समोर आले आहे. 

त्याचबरोबर हा मतदारवर्ग त्या भागातील राजकीय पुढाऱ्यांच्या विनंतीनुसार त्या भागातील स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसह विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी येत असल्याची जोरदार चर्चा होती. त्यातून विजयाचा आकडा सहज गाठला जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्याकडून भागनिहाय दुबार तिबार नावे, मयत, स्थलांतरीत, दोन मतदारसंघात नावे असे अनेक कारणांनुसार निवडणूक आयोगाच्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत ही नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत यासाठी स्थानिक कार्यकर्त्यामार्फत आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. 

त्यामुळे घनसावंगी तालुक्‍यात 10052, अंबड तालुक्‍यात सहा हजार , जालना तालुक्‍यात साडे चार हजार असे एकूण 21 हजार नावांवर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक मतदार यादीनुसार शंभर ते दीडशे नावांची यादी तयार झाल्याने गावा गावात चर्चा रंगली आहे. या संदर्भात प्रशासनाच्यावतीने घनसावंगी तहसील कार्यालयात सोमवार (ता.26) व मंगळवार (ता.27) सुनावणी होणार आहे. तर अंबड व जालना तालुक्‍यात सुनावणी सुरू झाल्या आहे. 

यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सोशल मिडीयावर देखील चर्चा रंगू लागल्या आहेत. यातून सुनावणीनंतर किती नावे वगळण्यात येतात, ही नावे कोणाच्या समर्थकांची आहे, आक्षेपाबाबत मतदारांची काय भूमिका आहे, प्रशासनांचा अंतिम निर्णय काय असेल याबद्दल मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय सर्वसामान्य मतदारांचे सुनावणीकडे लक्ष लागले आहे. 

राजकीय पक्षांकडून नियोजन 
शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांनी या भागात संपर्क कार्यालय निर्माण करण्यात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम या मतदार याद्यांचा अभ्यास करून ही नावे वगळण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यामार्फत आक्षेप घेऊन ही नावे वगळण्याची मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील अनेक लोक निवडणुकीच्या वेळेत दोन ठिकाणी मतदान करतात. त्यामुळे निवडणूकीच्या निकालावर परिणाम होतो असा दावा केला जातोय. 

त्यामुळे एकच नाव मतदार यादीत असावे असे पत्र माजी आमदार विलासराव खरात यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवल्याने नावे वगळण्याला सूचक पाठिंबा दिला असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचवेळी दुसरीकडे आपल्या समर्थकांची नावे वगळण्यात येऊ नये यासाठी आमदार राजेश टोपे यांच्या कार्यालयातून योग्य ते पुरावे जोडण्याचे काम सुरू असून सुनावणीच्या दरम्यान कार्यकर्त्यामार्फत या आक्षेपांना प्रतिउत्तर देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. 

संबंधित लेख