Rajendra Shingne & Harshwardhan Sapkal made joint tour on motorcycle | Sarkarnama

डाॅ. राजेंद्र शिंगणे- हर्षवर्धन सपकाळ म्हणतात.. ये दोस्ती हम नही तोडेंगे !  

अरूण जैन
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

बंदच्या आवाहनासाठी संपूर्ण शहरभर डाॅ. शिंगणे सपकाळ यांच्या मोटारसायकलवर फिरले. आम्ही सर्व आता एकत्रच आहोत अशी टिप्पणीही त्यांनी  केली. 

बुलडाणा: निमित्त होते इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी आयोजित बंदचे :मात्र या बंदचे आवाहन करताना माजीमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे व आमदार हर्षवर्धन सपकाळ एकाच मोटारसायकलवर स्वार झाल्याने  अनेकांना शोले मधल्या जय -वीरूच्या जोडीची आठवण झाले . 

आम्ही दोघे एकत्र आहोत.   ये दोस्ती ( आघाडी ) हम नही  तोडेंगे असाच दोघांचा सूर होता . आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुक प्रचाराची ही  रंगीत तालीम होती .  आता ही दोस्ती तुटणार हाय की  नाय यावरही नागरिकात  चर्चा होत्या. 

आगामी वर्ष हे निवडणुकीचे असल्याने राजकीय नेत्यांच्या प्रत्येक कृतीकडे याच नजरेतून पाहिले जात आहे. आज बंदचे आवाहन करण्यासाठी काॅग्रेस- राष्ट्रवादीच्या सोबतीला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप यासह विविध समाजघटक सहभागी झाले होते. या निमित्ताने शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. 

यामध्ये काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ चालवित असलेल्या बुलेटवर माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते डाॅ. राजेंद्र शिंगणे बसलेले होते. एरवी या दोघातील प्रेम सर्वश्रुत आहे . पण येत्या लोकसभा निवडणुकीत काॅग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार आणि या दोघांपैकी एक उमेदवार राहणार हे निश्चित मानले जात आहे. कारण हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे आणि पक्षाकडून डाॅ. शिंगणे यांचेच नाव पुढे आहे. 

सिंदखेडराजा व्यतिरिक्त डाॅ. शिंगणेंनी नुकताच मेहकरात एका कार्यक्रमात सक्रिय हजेरी लावून कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश देऊनही टाकला आहे. त्यानंतर आता इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी बंद पुकारला गेला. या बंदच्या आवाहनासाठी संपूर्ण शहरभर डाॅ. शिंगणे सपकाळ यांच्या गाडीवर फिरले. आम्ही सर्व आता एकत्रच आहोत अशी टिप्पणीही त्यांनी पत्रकारांकडे केली. 

दुसरीकडे काॅग्रेसमध्येही आमदार सपकाळ यांनी लोकसभा निवडणूक लढावी असा मोठा मतप्रवाह आहे. मात्र जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने ते फारसे स्वारस्य दाखवत नसले तरी जागावाटपात बदल झाले आणि पक्षांकडून आदेश आल्यास ते नाही म्हणू शकणार नाहीत.  त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विरोधकांतर्फे या दोघांपैकी एक उमेदवार राहणार हे निश्चित ! तेंव्हा प्रत्यक्ष निवडणुकीत हे दोघे एकत्र राहतात का याकडे मतदारांचे लक्ष लागून राहील . 
 

संबंधित लेख