Rajasthan elections : debate over Lord Hanuman's caste | Sarkarnama

हे राम ! या नेत्यांनी महाबली हनुमानाचीही जात काढली !

सरकारनामा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

एकंदर रस्ते , पाणी, वीज, आरोग्य , शिक्षण अश्या विषयांपेक्षा देव आणि धर्माच्या नावावरच निवडणुका लढविण्याचे नेते मंडळींचे धोरण दिसते . त्यामुळे  हनुमानभक्त  हे राम ! म्हणू लागले आहेत . 

लखनौ : भारतीय माणूस आणि जात हे अतूट बंधन आहे . जी जाता जात नाही तिलाच जात म्हणतात . कधी सरळ तर कधी आडून आडून समोरच्याची जात काय आहे याची विचारणा किंवा वेध घेणाऱ्या भारतीय माणसाचे नेतृत्व  करणारे कसे मागे राहतील ? राजस्थानच्या निवडणुकीत नेते मंडळींनी महाबली हनुमानाची जात कोणती यावरून मनसोक्त चर्चा  सुरु केली आहे . 

राजस्थान विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले होते, की बजरंगबली भारतीय परंपरेत लोकदेवता आहे. जो स्वत:च वनवासी आहे, गिरवासी आहे, दलित आहे, वंचित आहे. असा हा बजरंगबली सर्वाना एकत्र आणतो . 

धर्म आणि देवदेवतांचा विषय निघाला आणि रामदेवबाबा बोलले नाहीत असे कसे होणार ? रामदेवबाबा यांनी भगवान हनुमान हे ब्राम्हण होते असे विधान केले आहे . रामदेव बाबा म्हणतात , " देवदेवतांची कोणतीही जात नसते पण जातीचाच विचार करायचा तर हनुमान चारीही वेदात पारंगत होते . नीती आणि धर्म याचे प्रतीक आहेत . ब्रह्मचारी आहेत . त्यामुळे महाबली हनुमान कर्माने ब्राम्हण आहेत असेच मी म्हणेन . "  

अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते असा दावा केला आहे . ते म्हणतात "अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असतं. कुडूक या अनुसूचित जातीमध्ये तिग्गा नावाचे गोत्र आहे ज्याचा अर्थ वानर असा होतो.  श्रीरामाने दंडकारण्यात सैन्य म्हणनू गोळा केलेले  अनुसूचित जातींचे लोक होते. त्यामुळे हनुमान हे दलित नव्हे तर अनुसूचित जातीचे होते. "

केंद्रीय  मंत्री सत्यपाल सिंह यांना याबाबत विचारणा झाली असता ते म्हणाले , हनुमानजी आर्य होते . 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाला दलित म्हटल्याच्या विधानाला भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, "की देवाचा जातीशी संबंध जोडणे योग्य नाही.कुठल्याही जातीहूनही देव मोठा आहे. सर्व जातींमध्ये देव आहे. एखाद्या विशिष्ट जातीलाच देवाला जोडणे योग्य नाही."

कॉंग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विधानाची निंदा केली आहे. ते म्हणाले, " भाजप स्वत:ला आणि समाजाला विभाजित करीत आहे. त्यांनी पहिल्यांदाच देवाला जातीशी जोडले आहे."

एकंदर रस्ते , पाणी, वीज, आरोग्य , शिक्षण अश्या विषयांपेक्षा देव आणि धर्माच्या नावावरच निवडणुका लढविण्याचे नेते मंडळींचे धोरण दिसते . त्यामुळे  हनुमानभक्त  हे राम म्हणू लागले आहेत . 

संबंधित लेख