'मोदी तुझसे बैर नहीं, पर रानी तेरी खैर नहीं!'

गेल्या सुमारे 25 वर्षांत राजस्थानात कोणत्याच सत्ताधारी पक्षाला सलगच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळविता आलेला नाही. दर पाच वर्षांनी 'अँटी इन्कम्बम्सी फॅक्‍टर'ने सत्ताधारी पक्षाला झटका दिलेला दिसतो.
Vasundhara Pilot
Vasundhara Pilot

राजस्थानात भाजपची सत्ता जाणार तर काँग्रेसला अच्छे दिन येणार?  

बरोबर वीस वर्षांपूर्वीचे हेच दिवस. आज त्याची आठवण होण्याचे कारणही तसेच आहे. विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी "सकाळ'चा प्रतिनिधी म्हणून प्रथमच राजस्थानात जाण्याची संधी मिळाली होती. केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि राजस्थानातही त्याच पक्षाची सत्ता, यामुळे या पक्षाचे नेते, कार्यकर्ते (अति) उत्साहात होते. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान, तर दुसरे ज्येष्ठ नेते भैरोसिंह शेखावत या राज्याचे मुख्यमंत्री... आजही त्यासारखीच परिस्थिती आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर मुख्यमंत्रीपदी वसुंधरा राजे. राजस्थानात विधानसभा निवडणुकीचे मैदान त्याही वेळी असेच तापले होते आणि आजही तसेच. सत्ताधारी भाजपला पुन्हा सत्ता टिकविण्याचे आव्हान, तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसला संधीही पुन्हा तशीच....! 

गेल्या सुमारे 25 वर्षांत राजस्थानात कोणत्याच सत्ताधारी पक्षाला सलगच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळविता आलेला नाही. दर पाच वर्षांनी "अँटी इन्कम्बम्सी फॅक्‍टर'ने सत्ताधारी पक्षाला झटका दिलेला दिसतो. 1993 पासूनचा विचार केला तर भाजप आणि कॉंग्रेस हे पक्ष एकाआड एक पद्धतीने सत्तेवर विराजमान झालेले आहेत. यंदाचे एकूणच वातावरण, जनतेचा मूड, विविध माध्यमांनी जाणून घेतलेला निवडणूकपूर्व कौल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री वसुंधरा राजेंविषयीची सार्वत्रिक नाराजी या सर्व गोष्टी सत्तारूढ भाजपला फटका बसण्याची भविष्यवाणी वर्तवत आहेत. खरोखरच तसे घडले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल. 

स्थानिक नेत्यांचाच 'फेस'! 

पंतप्रधान मोदी यांच्या "होम स्टेट'- गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत अलीकडेच कॉंग्रेसने भाजपला कडवे आव्हान दिले होते. या राज्याला लागूनच असलेल्या राजस्थानच्या बालेकिल्ल्यालाही कॉंग्रेसच्या कडव्या आव्हानाचे असेच तडाखे बसण्याची दाट शक्‍यता आहे. वीस वर्षांपूर्वी वाजपेयी-शेखावत अशा धुरिणींनाही राजस्थानी जनतेवर प्रभाव पाडता आला नव्हता. आताही प्रभावशाली मोदी आणि मातब्बर वसुंधरा राजेंना आपल्या प्रचारातून कितपत चमत्कार घडवता येणार, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे राजस्थानसह पाच राज्यांत आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी-अमित शहा जोडीला सुरवातीपासून आघाडीवर न ठेवता, त्या-त्या राज्यातील मुख्यमंत्र्यालाच भाजपचा "फेस' म्हणून पुढे करण्यात आले आहे; जेणेकरून उद्या या राज्यांत पराभवाची नामुष्की पत्करायची वेळ आलीच तर त्याचे खापर केंद्रीय नेतृत्वावर फुटणार नाही, याची काळजी भाजपने घेतलेली दिसते. 

वसुंधरांविषयी नाराजी 

महाराणी वसुंधरा राजेंविषयीची नाराजी, हा यावेळचा मोठा मुद्दा ठरण्याची शक्‍यता आहे. आपल्या राजवटीच्या पहिल्या चार वर्षांत त्या सर्वसामान्य जनतेपासून दुरावल्याचे चित्र होते. त्यामुळे प्रभावशाली असूनही त्यांचा म्हणावा तसा प्रभाव जनेतवर पडू शकलेला नाही. मागील निवडणुकीच्या वेळी दिलेल्या अनेक आश्‍वासनांची पूर्तता त्यांच्याकडून न झाल्याने जनता त्यांच्यावर बरीच नाराज आहे. 'मोदी तुझसे बैर नहीं, पर रानी तेरी खैर नहीं,' अशा या वाळवंटी प्रदेशात घुमणाऱ्या घोषणा बरेच काही सांगून जातात. दुसरीकडे केंद्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी जुळवून घेण्यातही वसुंधरा राजे कमी पडल्याचे बोलले जाते. भाजप अंतर्गत असलेला हा बेबनावही यंदा नुकसानकारक ठरू शकतो. शेवटच्या टप्प्यात संघाने 'झाले गेले विसरून जाऊ आणि आधी विजयासाठी प्रयत्न करू,' अशी भूमिका घेऊन जोमदारपणे कामाला सुरवात केली खरी, परंतु, त्याला फार उशीर झाल्याचे मानले जाते. वसुंधरा राजेंच्या तुलनेत दुसरीकडे, कॉंग्रेसचे तरूण नेते सचिन पायलट हे राजस्थानातील मतदारांमध्ये सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत ते कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याही पुढे असल्याचे बोलले जाते. 

जातींचे राजकारण प्रभावी 

देशातील इतर राज्यांप्रमाणेच राजस्थानातही जातीपातींचा मुद्दा निवडणुकीत नेहमीच निर्णायक ठरतो. सर्वाधिक मोठी मतपेढी जाटांची आहे, त्याखालोखाल राजपूत आणि ब्राह्मणांचा क्रम लागतो. या पैकी राजपूत आणि ब्राह्मण मतदारांवर भाजपची नेहमीच भिस्त राहिलेली आहे. परंतु, या दोन्ही समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यात वसुंधरा राजे कमी पडल्याने हे हक्काचे समाजबांधव भाजपपासून दुरावण्याची भीती आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राजपूत नेते जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपला आधीच धक्का दिलेला आहे. तसेच नाराज ब्राह्मण नेते घनश्‍याम तिवारी यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. या राज्याच्या एकूण लोकसंख्येत राजपुतांचे प्रमाण 6-8 टक्के, तर ब्राह्मणांचे प्रमाण 7-8 टक्के आहे. येत्या सात डिसेंबरला, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी या समाजाच्या नाराजीचे प्रतिबिंब मतपेटीत किती उमटते, यावर भाजपचे भवितव्य अवलंबून असेल. 

निवडणूकपूर्व कौल कॉंग्रेसकडे! 


विविध माध्यमांनी घेतलेल्या निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांनी भाजपच्या हातातून सत्ता जाणार, असे भाकीत वर्तविताना कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. या राज्यातील 200 जागांच्या विधानसभेत कॉंग्रेसला यंदा 110 ते 120 दरम्यान, तर भाजपला 70 ते 80 दरम्यान जागा मिळतील, असे अंदाज यापूर्वीच जाहीर झालेले आहेत. हे अंदाज खरे ठरल्यास, 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या नीतीधैर्याचे निश्‍चितच खच्चीकरण होऊ शकते आणि या राज्यातील लोकसभेची निवडणूक भाजपला अधिकच कसोटीची आणि आव्हानात्मक ठरेल, यात शंका नाही. 


राजस्थान : गेल्या 25 वर्षांतील पाच विधानसभा निवडणूक निकाल 


----------------------------------------------------------------------------------------
वर्ष                मुख्यमंत्री पक्ष                        भाजप           काँग्रेस 
----------------------------------------------------------------------------------------
1993       भैरोसिंह शेखावत (भाजप)               95              76   
1998       अशोक गेहलोत (कॉंग्रेस)                 33            153   
2003       वसुंधरा राजे (भाजप)                    120              56  
2008       अशोक गेहलोत (कॉंग्रेस)                 78              96   
2013       वसुंधरा राजे (भाजप)                    163              21
--------------------------------------------------------------------------------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com