Raj Thakrey appoints Ajay Shinde as Pune city chief | Sarkarnama

राज ठाकरे यांचे पुण्यात धक्कातंत्र;  अजय शिंदे यांची शहरप्रमुख म्हणून निवड 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जून 2017

पुणे शहरात मनसेला मरगळ आली आहे. ती झटकण्यासाठी नव्या नेतृत्त्वाची पक्षाला गरज होती. बहुतेक ज्येष्ठ मंडळींनी पक्षाला याआधीच रामराम ठोकला आहे. दोन ऐवजी एकच शहराध्यक्ष नेमत राज ठाकरे यांनी धक्का दिला. 

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी धक्कातंत्र वापरत पुण्यातील संघटनेत प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. शहरप्रमुखपदी अजय शिंदे यांची एकट्याची फेरनिवड करून काम करणाऱ्याला पक्षात संधी असल्याचा योग्य तो संदेश यामुळे जाईल, अशी अपेक्षा आहे. 

या आधी संघटनेत दोन शहरप्रमुख राज ठाकरे नेमायचे. मात्र एकट्या शिंदे यांच्यावरच त्यांनी ही जबाबदारी टाकली आहे. शिंदे हे कोणा बड्या नेत्याचे चिरंजीव नाहीत किंवा एखाद्या पक्षाच्या राजकारणात "अर्थपूर्ण' भूमिका बजावणारेही नाहीत. संघटना बांधणे, कार्यकर्त्यांचा संच जमा करणे आणि आक्रमकपणे आंदोलने करणे, एवढेच त्यांचे काम. शेवटी पक्ष वाढवायचा असेल तर असेच कार्यकर्ते उपयोगी पडतात, हे अखेर संघटनेला उमगले आहे. मनसेची आतापर्यंतची वाटचाल पाहता शिंदे यांची निवड त्यामुळे "धक्का' ठरते. 

ठाकरे यांना नाशिक खालोखाल पुण्याने मोठा प्रतिसाद दिला होता. मात्र संपूर्ण राज्यातच मनसेला "मोदी लाटे'नंतर जी उतरती कळा लागली, ती काही संपायचे नाव घेत नाही. पुण्यात तर 2014 च्या पालिका निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले होते. खरे तर मनसेने आणखी जोर लावला असता आणि आपली हवा कायम ठेवली असती तर हा पक्ष पुण्यात भविष्यात सत्तेवर देखील आला असता, असे तेव्हाचे चित्र होते. असे "आश्‍वासक' वाटणाऱ्या मनसेचे पुण्यात आता केवळ दोन नगरसेवक आहेत.
 
त्यामुळेच अजय शिंदे यांच्यापुढील आव्हान मोठे आहे. पुण्यातील मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करून घेतले आहे. जे राज ठाकरे यांच्या जवळचे होते, ते देखील एका रात्रीत भाजपमध्ये गेले. यात त्यांची काही चूक नाही. कारण पक्षाची आणि नेत्याची चुकीची कार्यशैली ते किती काळ सहन करणार? ज्येष्ठ म्हणावे असे आता कोणी मनसेत राहिले नाही. ते गेल्यामुळे मनसेत आता नवीन रक्ताला मोठी संधी मिळाली आहे. राज ठाकरे यांनी स्वतः वेळ देऊन व स्वहस्ते शिंदे यांना शहराध्यक्ष नेमणुकीचे पत्र दिले. पक्षासाठी काय करावे लागेल, याच्या टिप्सही दिल्या. 

याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ""लोकांच्या प्रश्‍नांसाठी काम करणे, हेच संघटनेचे कर्तव्य आहे. त्यासाठी संघटनेतील नव्या-जुन्या नेत्यांचा मेळ घालून भविष्याची दिशा आखण्यात येईल. राजसाहेबांचा करिश्‍मा हीच आमची मोठी ताकद आहे. प्रत्येक पक्षाला चांगले किंवा वाईट दिवस येत असतात. सध्याच्या संकटावरही कार्यकर्त्यांच्या मदतीने आम्ही नक्की मात करू. दोन नगरसेवक असले तर जनतेच्या प्रश्‍नावर संघटना म्हणून आक्रमकपणे रस्त्यावर उतरू. पुण्याची जबाबदारी माझ्यावर देऊन साहेबांनी मोठा विश्‍वास माझ्यावर टाकला आहे. स्वतः साहेबांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे. तो विश्‍वास सार्थ ठरेल, अशीच कामगिरी पुण्यात करून दाखवू.''  

 
 

संबंधित लेख