raj thakre role in shetkari samp | Sarkarnama

राज ठाकरे यांना शेतकरी आंदोलनासाठी निमंत्रणाची गरज आहे? 

योगेश कुटे
बुधवार, 7 जून 2017

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या अस्तित्त्वहिन झाल्याची टीका होत असताना काही शेतकरी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना भेटले. शेतकरी संपाच्या आंदोलनाचे नेतृत्त्व तुम्ही करा, अशी विनंती या शेतकऱ्यांनी केली. इतर कोणत्याही राजकीय पक्षाला अशा प्रश्‍नांबाबत आंदोलनासाठी निमंत्रणाची गरज पडली असती का? उलट हीच संधी मानून ते आंदोलनात उतरले असते. राज यांचे मात्र सारेच विशेष असते. ही विनंती देखील "विशेष' मानली पाहिजे. 

भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे चार पक्ष शेतकरी संपाच्या बाजूने किंवा विरोधात कृतिशील भूमिका बजावत असताना दादरच्या "कृष्णकुंज' या बंगल्यावर वेगळेच चित्र होते. शेतकरी संपाची जेथून सुरवात झाली, त्या पुणतांबे गावातील काही शेतकरी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना भेटायला कृष्णकुंज बंगल्यावर गेले. "तुम्ही आमच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करा,' अशी मागणी राज यांना या शेतकऱ्यांनी केले. असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 

राज्यात चार पक्ष असताना आणि चारही पक्ष आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत, असा दावा करत असताना शेतकऱ्यांना राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाची गरज पडावी, हे विशेषच आहे. आता ही भेट स्वतः शेतकऱ्यांनीच मागितली होती की "कृष्णकुंज'वर बागडणाऱ्या इतर नेत्यांनी ती घडवून आणली, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. काही असले तरी राज यांची गरज शेतकऱ्यांना या स्थितीत वाटते आहे, असे समजायला हरकत नाही. कारण भाजपवाल्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे.. शिवसेनेला नक्की काय भूमिका घ्यावी, हे कळत नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवाल्यांनी तर याआधीच फार काही दिवे पाजळले नाहीत, म्हणून त्यांच्यावर नाराजी आहे. त्यामुळे राज यांनी आंदोलनात उतरावे, असे शेतकऱ्यांना वाटणे स्वाभाविक मानू या. मात्र आंदोलनाचे नेतृत्त्व करा, याचे निमंत्रण येण्याची वाट मनसेने पाहण्याची गरज होती का? जणू काही मनसेकडे इतर प्रचंड विषय पडले आहेत. सगळे नेते त्यात बिझी आहेत. आता कुठे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला हात घालायला त्यांना वेळही नाही, अशी स्थिती आहे का? 

राजकारणातील टायमिंग केव्हा? 

राज हे भाषणातील "टायमिंग' बद्दल प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांचे राजकारणातील "टायमिंग' सध्या बरोबर नाही. सरकारच्या विरोधातील प्रत्येक असंतोषाचे बीज त्यांना वाढवायला हवे. त्यासाठी त्यांनी आपल्या संघटनेला सज्ज ठेवायला हवे. थेट निवडणुकीच्या काळात तोफा धडधडून काही उपयोग होत नसतो. नेता व कार्यकर्ता सतत जनतेत असावा लागतो. ती राजकारणाची गरज आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या वयातही सरकारवर टीका करतात. गावोगावी जातात. सत्कार सोहळ्यांना उपस्थिती लावतात. सार्वजनिक जीवनात धुमकेतूसारखे उगवून चालत नाही. सतत आणि सतत लोकांत राहण्याला राजकारणात दुसरा पर्याय नाही. भले ते आंदोलनाच्या माध्यमातून असेल किंवा समारंभाच्या भाषणातून असेल. शेतकऱ्यांचे आंदोलन तर ही चालून आलेली संधी होती. शेतकरी संपाच्या बाजूने राज यांनी एक दिवस पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला चढविला. त्यानंतर काहीच नाही. थेट शेतकरीच साहेबांच्या बंगल्यावर पोचले, एवढीच बातमी आली. 

मनसे सध्या शांत का, याची दुसरी बाजूही समजून घ्या, असे आग्रह मनसे कार्यकर्ते करतात. एकतर संघटनेच्या स्थापनेपासून मराठीसाठी, टोलमाफीसाठी संघटनेने आंदोलने केली. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अनेक केसेस आहेत. त्यासाठी विविध शहरांतील न्यायालयांत चकरा माराव्या लागतात. आता हे परत आंदोलन आणि परत केसेस म्हणजे काय तोंडची गोष्ट आहे का, असा प्रश्‍न मनसे कार्यकर्ते विचारतात. हा प्रश्‍न बरोबर आहे. शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी तर संघटनेच्या स्थापनेपासून आंदोलनेच केली. राजू शेट्टी हे तर 2014 पर्यंत आंदोलनेच करत होते. स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संघटना स्थापनेनंतर 1995 पर्यंत सरकार विरोधातच सातत्याने भूमिका घेत होते. त्याचे फळ त्यांना 1995 मध्ये राज्यातील सत्तेने मिळाले. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या नेत्याला लोकांमध्ये सतत वावरण्याशिवाय पर्याय नाही. मोठ्या नेत्यांनी असे केले नाही तर ते "आऊट डेटेड' होतील, यात शंकाच नाही. 

राज यांची क्रेझ कायम! 

राज ठाकरे या नियमाला अद्याप अपवाद आहेत. ते राजकियदृष्ट्या सातत्याने सक्रिय नसूनही जनतेत त्यांची क्रेझ आहे. त्यांचा करिश्‍मा आहे, हे मान्यच करायला हवे. त्यामुळेच विरोधी पक्षातील "स्पेस' भरून काढण्याची जबाबदारी ते घेऊ शकतात. सध्याच्या विरोधी पक्षांना परिणाम साधण्यासाठी जे काही परिश्रम पडतात, त्या तुलनेत राज यांना थोड्याच प्रयत्नात परिणाम साधता येतो. त्यांनी एखाद्या प्रश्‍नावर ठाम भूमिका घेतली की सरकारही त्याचा विचार करते. त्यामुळेच शेतकरी संपाच्या निमित्ताने मनसेला पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळाली आहे. राज्य सरकारच्या विरोधातील असंतोषाला या आंदोलनामुळे हवा मिळत आहे. मोदी यांची लाटही 2014 प्रमाणे असणार नाही, हे यातून दिसते आहे. मग राज ठाकरे हे 2019 च्या निवडणुकीच्या आधीच बोलायला लागले तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल. राजकीय संकटासोबतच राज यांना वैयक्तिक आयुष्यातील संकटांशीही सामना करावा लागत आहे, हे बातम्यांमधून कळते आहे. अशी संकटे कोणाला चुकली आहेत. अशा संकटांवर राज हे मात करतीलच. राज यांचा शब्द तळहातावर झेलणारे हजारो कार्यकर्ते आज महाराष्ट्रात आहेत. त्यांची आणि मनसेच्या आगामी जडणघडणीची जबाबदारी राज यांच्यावरच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसारख्या आंदोलनात निमंत्रण येण्याची वाट पाहण्याची गरज त्यांना नाही. टोलमाफीच्या आंदोलनावरून मनसेबाबत संभ्रम पसरविला गेला. खरे तर हा मुद्दा मनसेने पुढे आणून राज्यात टोलमाफी करण्यात परिणामकारक भूमिका बजावली. हे मोठे यश होते. मात्र मनसेबाबच दुसऱ्याच चर्चा झाल्या. अशा आर्थिक आंदोलनापेक्षा शेतकऱ्यांचे आंदोलन किंवा मराठी माणसाच्या व्यापक हितासाठीचे आंदोलन मनसेला यश मिळवून देऊ शकते. त्यासाठी त्यांनी यापुढे निमंत्रणाची वाट पाहू नये. 

संबंधित लेख