Raj Thakray dissolves MNS office bearers with in a fortnight | Sarkarnama

नवरात्रात जाहीर केलेली मनसेची कार्यकारिणी कोजागिरी पाैर्णिमेला बरखास्त  

मनोज भिवगडे 
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

 नवरात्रात जाहीर केलेली कार्यकारिणी कोजागिरी पाैर्णिमेला बरखास्त केली. त्यांच्या या निर्णयाची अकोल्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.

अकोला :  राज ठाकरे...महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ...भाषणातून फटकेबाजी करण्यासाठी प्रख्यात...तसे ते निर्णय घेण्यातही फकेटबाज...त्यांच्या या फटकेबाजीचा फटका अकोला जिल्ह्यातील मनसेच्या आठ दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या कार्यकारिणीला बसला.

 नवरात्रात जाहीर केलेली कार्यकारिणी कोजागिरी पाैर्णिमेला बरखास्त केली. त्यांच्या या निर्णयाची अकोल्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकोला जिल्हा व शहर कार्यकारिणीची घोषणा १३ आॅक्टोबर रोजी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरण्यात आल्याने आता जिल्ह्यात मनसेचा संघटनात्मक गाडा रुळावर येईल, अशी अपेक्षा केली जात होती.

 मात्र, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पश्‍चिम विदर्भाच्या दाैऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या फटकेबाज शैलीचा परिचय देत अवघ्या एक आठवड्यापूर्वी जाहीर केलेली शहर व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. राज ठाकरे यांच्या या निर्णयाने आैटघटकेच्या ठरलेल्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना रडावे की हसावे, असे झाले आहे. 

अनेक वर्षांपासून प्रतीक्षा केल्यानंतर या नवरात्रीत मिळालेली पदं एका आठवड्यापूर्तीच ठरल्याने बरखास्त कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना स्वतःवरच हसू आले. 

मनसे जिल्हाध्यक्ष राज ठाकरे अकोला दाैऱ्यावर असताना त्यांनी भेटावे म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी विनंती केली होती. नाशिक येथे राबविलेल्या गाेदा पार्क प्रमाणे अकोल्यात मोर्णा पार्कची संकल्पना राबविणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या प्रकल्पासाठी राज ठाकरे यांना आदर्श माणून त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरविले होते. 

त्यासाठी राज  ठाकरे यांनी अकोल्यातील पदाधिकाऱ्यांना विचारून जिल्हाधिकाऱ्यांना भेटावे किंवा नाही, असा प्रश्‍न विचारून त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेतली. तेव्हा एका पदाधिकाऱ्याने त्याचे दिव्यज्ञान पाजळून जिल्हाधिकाऱ्यांना न भेटण्याची कारणे दिली.

त्या पदाधिकाऱ्याचे ज्ञान पाहून राज ठाकरे यांना येथील कार्यकारिणीची चांगलीच प्रचिती आली . शिवाय त्यांना पदांची संख्या आणी  वाटप योग्य वाटले नाही असेही समजते . त्यामुळे त्यांनी  बरखास्तीचा  निर्णय जाहीर केला.

राज ठाकरे यांनी संध्याकाळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची संध्याकाळी भेट घेतली . 

संबंधित लेख