Raj Thakray asked policeman ," What notes you have taken ?" | Sarkarnama

राज ठाकरेंनी पोलिसाला विचारले, काय लिहून घेतले ?  

संपत देवगिरे
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

यावेळी पदाधिका-यांनी राज ठाकरे यांच्याकडे शहराच्या समस्यांचा पाढा वाचला. तेव्हा राज ठाकरे म्हणाले , नाशिकला दत्तक घेतलेले वडील , देवेंद्र फडणवीस गेलेत तरी कुठे? त्यांना याचे काहीच कसे वाटत नाही ?   
 

नाशिक :   पुण्याला जाण्यासाठी मनसे नेते राज ठाकरे यांचे आज नाशिकला आगमन झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत झाले.  राज ठाकरे नाशिक येथे कार्यकर्त्यांशी अनौपचारिक  संवाद साधत असताना त्यांना एका व्यक्तीची हालचाल जरा वेगळी वाटली . त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीस विचारले तुम्ही कोण? 

त्यावर त्या व्यक्तीने चाचरत सांगितले ,मी   पोलीस  आहे . 

त्यावर हसत हसत राज ठाकरे म्हणाले ,  "काय काय लिहून घेतले ?"  

एवढ्या बोलण्यावर  राज ठाकरेंनी  पोलिसदादाची सुटका केली .  हे पोलीस  महाशय बंदोबस्तासाठी होते की कशासाठी हा विषय निघाला नाही . हे पोलीस महाशय साध्या वेशात होते . 

सुरवातीला 'नेहमी मीच बोलायचे का?' असे म्हणत "तुम्ही बोला, मी ऐकतो,' असे सांगून श्री. ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बोलते केले. त्यांचा आदेश होताच कार्यकर्त्यांनी एकलहरे येथील वीजनिर्मिती कंपनीचा 660 मेगावॉट प्रकल्प बंदच्या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये असलेल्या रोषाची माहिती दिली. 

 मनसेच्या काळात उभारलेल्या वाहतूक बेटाची शहरात दुरवस्था झाली असून, मनसेच्या प्रकल्पाच्या पळवापळवीची माहिती दिली. शहरातील सिडको, सातपूर अशा विभागनिहाय समस्यांचा पाढा काही कार्यकर्त्यांनी वाचला. पालकमंत्री, तीन आमदार, महापालिकेतील सत्ता आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊनही इथल्या मूलभूत सुविधांची वाट लागल्याची व्यथा कार्यकर्त्यांनी मांडली. 

महापालिकेतील करवाढ आणि त्या अनुषंगाने रंगलेल्या अविश्‍वासनाट्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. त्यावर श्री. ठाकरे यांनी जनतेने केलेला विरोध कमी होता का ?  असा प्रश्‍न केला. 

राज ठाकरे नाशिक कार्यकर्त्यांच्या संवादानंतर त्यांनी स्केटिंग संघटनेच्या अडचणी जाणून घेतल्या. स्केटिंगसाठी अद्ययावत ट्रॅकसाठी मदतीसाठी सुजाता डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साकडे घातले.

 शिवसेनेचे पहिले खासदार राजाभाऊ गोडसे यांचे नुकतेच निधन झाले. श्री. ठाकरे सोमवारी त्यांच्या संसरी येथील निवासस्थानी जाऊन गोडसे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतील. त्यानंतर ते पुण्याला रवाना होतील.

यावेळी माजी महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष अनिल मटाले, ऍड. राहुल ढिकले, मनसेचे महापालिकेतील गटनेते सलीम शेख, माजी नगरसेविका सुजाता डेरे, असलम मणियार, मनसे विद्यार्थी सेनेचे श्‍याम गोहाड, संदीप भवर, नितीन साळवे, संतोष सहाणे उपस्थित होते. 

संबंधित लेख