राज ठाकरे, तुम्ही गप्प का? 

मनसेचे सहा नगरसेवक आपल्याकडे ओढून शिवसेनेने भाजपची बोलती बंद केली खरी; पण मुंबईतील संघर्षाची आणि नगरसेवकांच्या फोडाफोडीची ही तर सुरवात आहे. आता भाजप कोणता नवा डाव खेळणार, यावरच राज्याच्या सत्तेची भविष्यातील वाटचाल अवलंबून आहे.
राज ठाकरे, तुम्ही गप्प का? 

शिवसेना आज दुहेरी आनंद लुटत आहे. नांदेडमधील भाजपच्या पराभवाचा आणि मुंबईमध्ये भाजपची बोलती बंद केल्याचा! नांदेड महापालिकेत आपण 14 वरून एक सदस्यावर आल्याचं यत्किंचितही दुःख शिवसेनेला नाही. कॉंग्रेसलाही जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद भाजपच्या पराभवानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झाला आहे. नांदेडबरोबरच मुंबईमध्येही महापालिकेच्या भांडूप जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्या आणि भाजपनं शिवसेनेवर पलटवार केला. "मुंबईमध्ये महापौर भाजपचाच होणार' असं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर करून शिवसेनेच्या मर्मस्थानावरच वार केला. नांदेडमधील पराभवानं भाजप घायाळ झाली, तर मुंबईमधील पोटनिवडणुकीनं शिवसेना अत्यवस्थ झाली! 

मुंबई महापालिका ही 27 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली सर्वांत श्रीमंत महापालिका. त्यामुळं राज्यातील इतर महापालिकांपेक्षा साहजिकच या शहरावरील पकड शिवसेनेसाठी महत्त्वाची. मुंबई महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आणि शिवसेनेच्या जवळपास आपल्या नगरसेवकांची संख्या नेऊन ठेवली. मुंबई महापालिकेच्या सत्तेत वाटा न मागता बाहेरून पाठिंबा देण्याची रणनीती भाजपने आखली. पारदर्शी कारभार आणि लोकहिताची कामे या मुद्‌द्‌यावर आपला पाठिंबा राहील, असे सांगत भाजपने पाठिंबा काढण्याची आणि सत्तेवर दावा करण्याची वाट आपल्यासाठी खुली ठेवली. नारायण राणे कॉंग्रेस सोडून भाजपच्या कच्छपी लागल्यानंतर त्यांनादेखील मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता मनाला टोचणी लावीत असणारच. राणेंच्या मदतीने कॉंग्रेसचे नगरसेवक फोडून घ्यायचे, अशी योजना भाजपतर्फे आखली जात असल्याच्या बातम्याही येत होत्या. त्यामुळे भांडूपच्या पोटनिवडणुकीतील विजयाने मुंबईच्या सत्तापदाच्या जवळ पोचल्याचा आनंद भाजपला झाला. आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तडाखून टीका करीत आगीत तेल ओतण्याचे काम केले. 

सत्तेच्या सारीपाटावरील भाजपचा आक्रमक प्रवास पाहता, शिवसेनाही गप्प बसणार नव्हतीच. एकमेकांवर होणारे दररोजचे वार पाहता, याची प्रचिती येतेच. मुंबई महापालिकेत विशेषतः स्थायी समितीमध्ये एकही प्रस्ताव भाजप शिवसेनेला सुखाने मंजूर करू देत नाही. त्यामुळे मनसेचे नगरसेवक आपल्याकडे खेचून शिवसेनेने भाजपला जोरात चपराक लगावली आहे. 

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून 2006 मध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) दिवसेंदिवस अधोगतीच सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला केवळ सात जागा मिळाल्या. त्यामुळे एक आमदार आणि बोटावर मोजण्याएवढे नगरसेवक, हीच काय ती या पक्षाची आजची राज्यातील ओळख. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेने शिवसेनेबरोबर युती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, ती काही फलद्रुप झाली नाही. मनसैनिक हे पूर्वाश्रमिचे शिवसैनिक! त्यामुळे एकमेकांची मने जुळतातच. साहजिकच मनसेचे नगरसेवक आपल्याकडे वळवणे सोपे, हे शिवसेनेने ताडले. मोहीम फत्ते झाली. मनसेचे सहा नगरसेवक शिवबंधनात पुन्हा अडकले. भाजपच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागला. त्यापुढे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरवात झाली. मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचाही आरोप होतो आहे. मनसेच्या सात नगरसेवकांपैकी एकच नगरसेवक निष्ठावंत निघाला! 

मनसेच्या नगरसेवकांची फोडाफोडी झाली; ते शिवसेनेत दाखल झाले. याचा थांगपत्ता राज ठाकरे यांना कसा लागला नाही, हा खरा प्रश्‍न आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच फेसबुक पेज सुरू केले आहे. मनसे सैनिकांशी संवाद साधण्यासाठीच त्यांनी हे पेज सुरू केले आहे. एलफिन्स्टन रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी त्यांनी संतप्त मोर्चाही मुंबईत काढला. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा सक्रिय होत असताना पाहयाला मिळत होते. चाचपडत सुरू असलेल्या मनसेच्या प्रवासाला मिळालेला काहीसा वेग मुंबईतील घटनेने पुरता शून्यावर आला आहे. आपल्याच पक्षातील नगरसेवकांचे मनसुंबे राज ठाकरे यांना माहीत कसे नव्हते? ज्या नगरसेवकांनी "बेईमानी' केली, त्यांना आता मनसे काय बोलणार आहे? मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी काल बोलताना सांगितले, की मनसेला सोडून शिवसेनेत दाखल झालेल्यांना भविष्यात पश्‍चात्ताप होणार आहे. परंतु, मनसेच्या कार्यकर्त्यांना पश्‍चात्ताप होतो आहे, त्याला काय उत्तर देणार? राज ठाकरे यांच्या "कृष्णकुंज'वर आज मनसेचे कार्यकर्ते धडकले होते. राज्यातील मनसेचे कार्यकर्ते खूपच अस्वस्थ झाले आहेत; सैरभैर झाले आहेत आणि राज ठाकरे तर गप्प आहेत! फेसबुकवरही त्यांनी एकही शब्द लिहिलेला नाही. घायाळ मनसे सैनिक राज ठाकरेंचे म्हणणे ऐकण्यासाठी आसुसले आहेत. राज ठाकरे, तुम्ही गप्प का, असा प्रश्‍न प्रत्येक कार्यकर्त्याला पडला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी मनसे फोडण्याची केलेली खेळी राजकारण कसे कठोरपणे आणि निर्दय पद्धतीने चालते, याची प्रचिती देणारी आहे. उद्धव ठाकरे यांनी ही चाल खेळून एका दगडात अनेक पक्षी मारले असले तरी एक दगड हा हळव्या मराठी मनालाही लागला आहे. मनसेने महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेबरोबर युतीसाठी पुढाकार घेतला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या लहान भावाचा हा प्रेमाचा हात त्यावेळी झिडकारला. आता सर्व बाजूंनी राज ठाकरेंची कोंडी झालेली दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी निर्णायक घाव घातला आहे. मोठ्या भावाने लहान भावाचे प्रेम झिडकारायचे आणि दांडगाईने लहान भावाकडे मौल्यवान वस्तू हिरावून घ्यायच्या असा प्रकार घडल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेवरील पकड घट्ट झाली असली, तरी मुंबईच्या मराठी माणसाच्या मनातून ते काही प्रमाणात उतरले आहेत. उद्धव आणि राज या दोघांनी मिळून एक विचाराने हा प्रकार केला असेल, तर ते भविष्यात उजेडात येईलच. पण तोपर्यंत तरी राज ठाकरे यांच्याविषयी सर्वसामान्यांना सहानभूती राहील. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com