raj thackrey supports ganesh mandals | Sarkarnama

शिवसेनेच्या आधी मनसेचा `श्रीगणेशा`: राज ठाकरे ठामपणे मंडळांच्या पाठीशी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

गणेशोत्सवात मोठे मंडप घालण्यावरून मुंबईत मंडळांत नाराजी आहे. उच्च न्यायालयाने याबाबत मुंबई महापालिकेला सूचना दिल्याने पालिकेने अद्याप या मंडळांना परवानगी दिलेली नाही. साहजिकच आता या प्रश्नात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सगळ्यात आधी उतरून मंडळांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बाळा नांदगांवकर यांच्यासह गिरगावातील खेतवाडी गणेशमंडळांना भेट दिली. यावेळी प्रचंड गर्दीत त्यांचे स्वागत झाले. गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असताना गणेशोत्सव मंडळांनी राज यांच्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे या विषयात राज यांनी सगळ्यात आधी हात घालून आपला दबदबा कायम ठेवला.

खेतवाडीत उंच गणेशमूर्ती असतात त्यामुळे मोठे मंडप घालावे लागतात. त्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक अडते. न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते अडवतील अशा मंडपांना परवानगी देता येत नसल्याने या मंडळांना परवानगी मिळालेली नाही. राज ठाकरे यांनी आज खेतवाडीला येऊन या मंडळांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, गणेशमंडळांनी पूर्वीप्रमाणेच उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. गेली 60-70 वर्षे इथे उत्सव साजरा होत आहे. पण आताच तक्रार आली. मुंबईतील अनेक रस्ते इतके अरुंद आहेत की गाड्या किंवा रुग्णवाहिकाही जाऊ शकत नाहीत. त्यावेळी कुणी काही बोलले नाही. उत्सव आले की सर्व बोलतात. मी मंडळांना आवाहन करतो की, त्यांनी चिंता न करता पूर्वीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करावा.

उच्च न्यायालय व पालिकेच्या निर्बंधांमुळे विविध समस्यांचा सामना करणाऱ्या दक्षिण मुंबईतील खेतवाडीच्या गणेश मंडळांना "मी उद्या स्वत: खेतवाडीत येईन" हा दिलेला शब्द पाळत मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांनी आज या मंडळांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

विविध समस्यांसाठी अनेक मंडळी राज ठाकरे यांनी भेट देतात. त्यात आता गणेशोत्सव मंडळेही मागे राहिलेली नाहीत. साहजिकच सोशल मिडियात मनसैनिकांनी शिवसेनेवर टीका सुरू केली. आता या टिकेला शिवसैनिक कसे उत्तर देणार, हे पाहायला हवे.  

संबंधित लेख