नाणारमधून 'परब' जातील 'अरब' येतील : राज ठाकरे

जेवण तयार आहे ही माझी सगळ्यात आवडती पाटी. मालवणी जेवणाला सगळ्यांची पसंती असते; पण कोकणात चायनीजच्या गाड्या दिसतात. दक्षिणेकडील लोक आपल्या आहाराचा अभिमान बाळगतात; आपण मात्र आपल्याच जेवणाला कंटाळलोय. - राज ठाकरे
नाणारमधून 'परब' जातील 'अरब' येतील : राज ठाकरे

मी प्रगतीच्या विरोधात नाही; पण नाणार प्रकल्प आणि बुलेट ट्रेन याला माझा विरोध आहे. त्याची कारणेही दिलेली आहेत. राज्यकर्त्यांना आलेला झटका आणि त्यातून जन्मलेला प्रकल्प हे राज्याचे धोरण होवू शकत नाही. नाणारचा प्रकल्प सौदी अरेबियासाठी आहे. उद्या तुमचे तिथले परब जातील आणि अरब येतील. जगात घडले ते कोकणात होवू शकत नाही असे काहीच नाही. कोकणी माणसाने केवळ सरकार करणार म्हणून राहून चालणार नाही. स्वतःही हातपाय हलवायला हवे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी कोकणच्या विकासावर दिलखुलास गप्पा मारल्या. 

प्रश्‍न : कोकणाच्या विकासवाटेकडे तुम्ही कसे पाहता? 
उत्तर : कोकणात कशाचीच कमतरता नाही. जगात घडले ते इथे होवू शकणार नाही, असे काहीच नाही. कोकणासारखी भूमी इतर कुठे असती तर त्यांनी काय केले असते ? केरळात बघा. तिथल्या लोकांना, पर्यटनाचा अभिमान आहे. तसे प्रकल्प हवे, विकास असायला हवा. सरकार येणार आणि करणार अवलंबून राहू नका. तुम्हालाही हातपाय हलवायला हवे. सरकारे येतील जातील इथल्या अनेक गोष्टी निर्यात करायला संधी आहे. कोणी थांबवलेय तुम्हाला? 

प्रश्‍न: कोकणात प्रकल्पांना विरोध होतो. काय कारणे असतील? 
उत्तर : प्रकल्पाबाबत इतर देशांसारखे आपल्याकडे धोरण नाही. प्रकल्पात तिथल्या भूमिपूत्रांना भागीदार बनवून घ्यायला हवे. इथे प्रकल्प आणताना भूमिपुत्राचा विचार होतो का? आमचे राज्यकर्ते परदेशात जातात. तिथे काही तरी बघतात. हे इथे येतात आणि इथे घोषणा करतात. प्रकल्पात जमिन गेली की भूमिपुत्राचे अस्तित्वच संपते. त्याला अशा प्रकल्पात भागीदार करून घ्यायला हवे. 

प्रश्‍न : प्रकल्प जाहीर होण्याआधीच परप्रांतीय कोकणात जमिनी खरेदी करतात. याला जबाबदार कोण? 
उत्तर : याला सरकार किंबहूना त्यातली यंत्रणा जबाबदार. कारण त्यांनाच याची माहिती असते. अमराठी लोक आधी कमरेतून वाकून येतील. हातपाय पसरतील. मंदिरात ट्रष्टी बनतील. आपला मतदार संघ बसवतील. आपली वर्तमानपत्रे काढतील. तुमचे अस्तीत्वच हिरावून जाईल. मुलुंडमध्ये भाजी विक्रेत्याला किरीट सोमयांनी दादागिरी केली. ही परिस्थिती इथे यायला वेळ लागणार नाही. 

प्रश्‍न : चाकरमान्यांच्या जमिनी अशा स्थितीत जास्त प्रमाणात विकल्या जातात. त्याबद्दल काय? 
उत्तर : जमिन, मालमत्ता हे अस्तित्व असते. आतापर्यंत रामायण वगळता सगळी युध्द जमिनीसाठी झाली. त्या विकून तात्कालीक फायदा मिळेल; पण अस्तित्व संपून जाईल. चाकरमानी नोकरी, व्यवसायात स्थीरावलेले असतात. त्यांनी गावाकडच्या जमिनी विकू नये. जमिनी कोणाला विकता, नंतर तुम्ही काय कराल याचा विचार करा. 

प्रश्‍न : नाणारबाबत काय सांगाल? 
उत्तर : मी प्रगतीच्या विरोधातील नाही; पण नाणार आणि बुलेट ट्रेन याला माझा विरोध आहे. त्याची कारणेही दिली आहेत. इतका प्रचंड खर्च करून गुजरातच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेन आणली जातेय. नरेंद्र मोदी भारताचे नाही गुजरातचे पंतप्रधान आहेत. आधीच कर्जबाजारी महाराष्ट्र मोदींच्या हट्टासाठी बुलेट ट्रेनला मोठे कर्ज काढणार आहे. आयआयएम अहमदाबादणे बुलेट ट्रेन चालणे कठिण असल्याचा अहवाल दिला आहे. राज्यकर्त्यांना आलेला झटका हे राज्याचे धोरण असू शकत नाही. नाणारबाबतही तसेच आहे. सौदी अरेबियाच्या फायद्यासाठी हा प्रकल्प राबवला जातोय. उद्या तेथून आमचे परब जातील आणि अरब येतील. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com