raj thackery to write book on lata mangeshakar | Sarkarnama

राज ठाकरे लिहिणार लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक 

उमेश घोंगडे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मनसेप्रमुख राज ठाकरे हे एक कलासक्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या गाण्यापासून ते मराठी नाटकाच्या प्रयोग या  साऱ्यांचा ते आस्वाद घेतात. लता मंगेशकर हे त्यांचे आवडत व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यावरतीच पुस्तक लिहिण्याचा राज यांचा मानस आहे.  

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्टाला ओळख आहे ती तरूणांचे नेते, व्यंगचित्रकार म्हणून पण आता राज ठाकरे लेखकाच्या रूपात समोर येणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर ते लवकरच पुस्तक लिहिणार असून त्याची तयारी त्यांनी सध्या सुरू केली आहे. 

ठाकरे आज पुण्यात होते. त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय तसेच फिल्म इन्स्टिट्यूटला भेट दिली. या दोन्ही संस्थांना भेटण्याची त्यांची खूप दिवसाची इच्छा होती. मात्र कामाच्या घाईत तो योग जुळून येत नव्हता. राज ठाकरे यांना चित्रपटांची खूप आवड आहे. या आवडीचा भाग म्हणून आज त्यांनी फिल्म संग्रहालयात जाऊन जुन्या त्रिपटांच्या संग्रहाची माहिती घेतली. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आज कामानिमित्त दिल्लीला होते. मात्र ठाकरे यांनी जुने फोटो तसेच जुन्या चित्रपटांच्या संग्रहाची कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.

लता मंगेशकर यांची जुनी गाणी व काही छायाचित्रेदेखील पाहिली. मंगेशकर यांच्यावरील पुस्तकात गाणी गाण्यासाठी लता मंगेशकर यांनी हातानी लिहिलेला गाण्यांची कडवीदेखील समाविष्ट करण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. चित्रपट संग्रहालयाबरोबरच ठाकरे यांनी फिल्म इन्स्टिट्यूटला भेट देऊन परिसराची पाहणी केली तसेच तेथील ग्रंथालय पाहिले. 

पुण्यात आल्यानंतर ठाकरे यांनी या दौऱ्यात कोणताही राजकीय कार्यक्रम न ठेवता कलाकार म्हणून या दोन्ही संस्थांना भेट देण्यासाठी वेळ व्यतीत केला. राजकीय कार्यक्रम किंवा राजकीय बैठका असल्यानंतर कार्यकर्त्यांचा नेहमी गराडा असतो. मात्र आज त्यांनी हे सर्व टाळून कलाकाराची भूमिका पार पाडली. राज यांच्याकडे भाषाप्रभुत्व आहे. ते रोखठोक बोलतात. पण आता गानसम्राज्ञीच्या चरित्राच्या रुपाने त्यांच्यातील सुरेल भाषेचा नजराणाही या निमित्ताने पुढे येणार आहे. राज यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे चरित्र फोटोबायोग्राफीतून मांडले आहे. लता मंगेशकर यांच्या पुस्तकासाठी ते कोणता फाॅर्म वापरणार, हे अद्याप ठरायचे आहे.
 

संबंधित लेख