खड्ड्यांविरोधात लढणाऱ्या मनसैनिकांचे राज यांच्याकडून अभिनंदन

आमच्या आंदोलनातून महाराष्ट्रातील जनतेचा रोष समोर येत आहे आणि ह्याची काहीशी भीती सरकारला वाटत असावी म्हणून महाराष्ट्र सैनिकांवर खटले दाखल केले जात आहेत, त्यांची धरपकड सुरु आहे. पण मुळातच महाराष्ट्र सैनिक असल्या केसेसना घाबरत नाही - राज ठाकरे
खड्ड्यांविरोधात लढणाऱ्या मनसैनिकांचे राज यांच्याकडून अभिनंदन

पुणे : राज्यात मुंबई-पुण्यात आणि अन्य शहरांमध्येही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे काही जणांचे बळीही गेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांत आंदोलने केली. मंत्रालयासमोरचा पदपथही उखडण्याचा प्रयत्न केला. ही आंदोलने करणाऱ्या व ज्यांच्यावर आंदोलनामुळे गुन्हे दाखल झाले आहेत अशा कार्यकर्त्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पेजवरुन अभिनंदन केले आहे. 

आपल्या फेसबूक पेजवर राज म्हणतात.....

........राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग असो अथवा मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुणे ते थेट चंद्रपूरपर्यंतच्या महापालिका, ह्यांच्या बेजबाबदार आणि असंवेदनशील कारभारामुळे 'रस्त्यात खड्डे' म्हणायच्या ऐवजी 'खड्ड्यात रस्ता' म्हणावं लागेल अशी सर्वत्र परिस्थिती आहे. खड्ड्यात पडून नागरिकांचा मृत्यू होत आहे. कालच मुंबईतल्या ताडदेवमध्ये सौ. अदिती काडगे ह्या महिला खड्ड्यात पडल्या आणि त्यांच्या मेंदूला जबर इजा झाल्याची बातमी वाचनात आली. महाराष्ट्राचं हे चित्र दुर्दैवी आहे.

ह्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणं शक्यच नाही. गेले काही दिवस पक्षातर्फे, राज्यभर माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलनं सुरु आहेत. ही आंदोलनं लोकांसाठी आहेत. असंवेदनशील सरकारी व्यवस्थेला जागं करण्यासाठी सुरु आहेत.

मग ते खड्डयांनी भरलेल्या शीव-पनवेल रस्त्यावर केलेलं आंदोलन, कल्याण-डोंबिवली महापालिकेवर नेलेला मोर्चा असेल, पुण्यातील प्रशासकीय कार्यालयात तिरडी ठेवून निषेध केलेलं आंदोलन, चंद्रपूरमध्ये खड्ड्यात मत्स्यपालन करून केलेलं निषेध आंदोलन, पालघरमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन, बांधकाम विभागाच्या कार्यालयात जावून रक्तदान करणं, मंत्रालयासमोरील प्रतीकात्मक आंदोलन, मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दुरुस्तीसाठी केलेलं यशस्वी आंदोलन, मुंबईत टोलबंद आंदोलनाची हाक, ठाणे शहरातील निदर्शनं असतील. हेतू एकच ह्या व्यवस्थेला स्वतःची लाज वाटावी आणि परिस्थती सुधारावी.

आमच्या आंदोलनातून महाराष्ट्रातील जनतेचा रोष समोर येत आहे आणि ह्याची काहीशी भीती सरकारला वाटत असावी म्हणून महाराष्ट्र सैनिकांवर खटले दाखल केले जात आहेत, त्यांची धरपकड सुरु आहे. पण मुळातच महाराष्ट्र सैनिक असल्या केसेसना घाबरत नाही.

उत्तम दर्जाचे रस्ते हा नागरिकांचा अधिकार आहे आणि तो जर त्यांना मिळत नसेल तर ह्याहून तीव्र आंदोलनं माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडून होतील. गेले कित्येक दिवसांपासून विविध आंदोलनांनी महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा मला अभिमान आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com