raigad maratha andolan | Sarkarnama

रायगडमधील मराठा समाज रस्त्यावर 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

अलिबाग ः आतापर्यंत शांत असलेल्या रायगड जिल्ह्यातील मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवली. महाराष्ट्र बंदची हाक आणि प्रत्येक तहसील कार्यालयावरील मोर्चाच्या आयोजनामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रभाव दिसून आला. 

अलिबाग ः आतापर्यंत शांत असलेल्या रायगड जिल्ह्यातील मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवली. महाराष्ट्र बंदची हाक आणि प्रत्येक तहसील कार्यालयावरील मोर्चाच्या आयोजनामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रभाव दिसून आला. 

अलिबागमधील मुख्य मोर्चात पाच हजार मोर्चेकऱ्यांनी भाग घेतला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय रात्री उशिराने घेतला होता. याबाबत प्रवासी अनभिज्ञ असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. ग्रामीण भागातील मोर्चेकऱ्यांनी खासगी वाहनांचा वापर करत मोर्चाच्या ठिकाण गाठले. मराठा समाजाचा प्रभाव असणाऱ्या माणगाव, पोलादपूर, महाड, खालापूर या तालुक्‍यांत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

प्रत्येक तहसील कार्यालयात मोर्चाने येऊन मोर्चेकऱ्यांनी शांततेत निवेदने दिली असून, जिल्ह्यात मोर्चा आणि बंद शांततेत पाळला जात असल्याचे पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले आहे. महाड, पेण येथे मोर्चेकऱ्यांनी सकाळी 11 च्या सुमारास चक्का जाम केले होते. खोपोली, खालापूर, पेण येथेही शांततेत बंद पाळण्यात आला. श्रीवर्धन, म्हसळा येथे बंदला अल्प प्रतिसाद होता.

 शाळांमध्ये विद्यार्थी आलेच नाही 
बंदच्या पार्श्‍वभूमीवर पालकांनी आपल्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवावे, असे कळविल्याने अलिबागमधील शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आलेच नाहीत. शाळेचे शिक्षक नियमितपणे आले होते; मात्र विद्यार्थी न आल्याने शाळा परिसरात शुकशुकाट होता. मोर्चादरम्यान यापूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावरुन अफवा पसरविणाऱ्या ग्रुपवर रायगड सायबर सेलने करडी नजर ठेवली होती. मोर्चामध्ये भडक भाषणे, घोषणाबाजी यांची संपूर्ण चित्रफीत पोलिसांनी तयार केली आहे. 

संबंधित लेख