राहुल शेवाळे : सेनेचा शाखाप्रमुख ते मुंबईचा खासदार

राहुल शेवाळे : सेनेचा शाखाप्रमुख ते मुंबईचा खासदार

मुंबईमध्ये सायन जवळील काळा किल्ला परिसरातील पारशी चाळीतल्या एका छोटेखानी खोलीत बालपण गेलेला राहुल शेवाळे नावाचा तरूण त्याच भागाचे संसदेत प्रतिनीधीत्व करतो. ही खरी नवलाची गोष्ट आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, तसा फारशा कुठल्या चळवळीशी संबंध नसताना राजकारणार काही अपवाद वगळता यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करत गेलेला तरूण राजकारणी म्हणजे राहुल शेवाळे.

वडील भारतीय नौदलात कारकून म्हणून कार्यरत तर आई महानगर टेलीफोन निगम मध्ये नोकरीला. बेताचा पगार आणि मुंबईसारख्या शहरात वास्तव्य ही तारेवरची कसरत शेवाळे यांची आई वडीलांनी खासकरून आईने लीलया पेलली. लहानपणी अबोल असलेल्या राहुल शेवाळे यांचे राजकीय व्यक्तीत्व खुलत गेले ते वांद्र्याच्या शासकीय अभियंत्रीकी कॉलेजमध्ये. येथे स्थापत्य पदविकेचा अभ्यसक्रम पूर्ण करत असताना कॉलेजच्या निवडणुकीत विद्यार्थ्यी सेनेच्या अजिंक्य पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवून कॉलेजचा जीएस झाला. कॉलेज संपल्यावर मात्र नोकरीच्या शोधात सामान्य बेरोजगार तरूणाप्रमाणेच राहुलनेही काही वर्षे भटकंती केली. दरम्यानच्या काळात त्यांचा काही शिवसेना नेत्यांशी संपर्क आला. एव्हाना शेवाळे कुटुंबी काळाकिल्ल्याहून मानखुर्दला स्थलांतरीत झाले. येथे राहुल मधील राजकीय सुप्त गुणांना वाव मिळाला.

येथील शिवसेनेच्या शाखा क्र. 186 चे शाखाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी राहुल यास मिळाली. त्यानंतर य़ा निष्ठावंत शिवसैनिकाने मागे वळून पाहिलेच नाही. शाखाप्रमुख म्हणून केलेल्या चांगल्या कामगीरीचे फळ म्हणून सन 2002 सालीची मुंबई महानगर पालीकेची निवडणूक अपक्ष लढून जिंकली. नगरसेवक म्हणून केलेल्या कामगीरीचे फळ म्हणून ते प्रभाग समिती अध्यक्ष झाले. याच काळात नायगाव भागातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवीका कामीनी मयेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 14 फेब्रुवारी या दिवशी झालेला हा विवाह शिवसेनेच्या व्हॅलेंटाईन डे विरोधामुळे चर्चेचा विषय झाला होता.

2005 मध्ये ट्रॉंम्बे विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढण्याची संधी पक्षाने त्यांना दिली मात्र दुर्दैवाने त्यास यश आले नाही. त्यातून सावरत त्यांनी 2007 च्या महानगरपालीका निवडणुकीत आपले नगरसेवक पद बहुमताने राखण्यात यश मिळवले. 2012 साली पुन्हा ते महानगर पालीकेवर निवडून आले. या वेळी त्यांना मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. पुढे सलग चार वर्षे शेवाळे स्थायी समिती अध्यक्ष राहिले.

त्यांच्या राजकीय वाटचालीचे फळ म्हणून शिवसेनेने त्यांना 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत दक्षिण मध्यमुंबई मतदार संघाची निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्यावेळी शेवाळेंना ही संधी आहे की त्यांचा बळी दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. कारण त्यांना लढत द्यायची होती तत्कालीन समाजकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील व या आधी या मतदार संघाचे प्रतिनीधीत्व करत असलेले खासदार एकनाथ गायकवाड यांच्याशी. मात्र त्यांनी शिस्तबद्ध प्रचाराने गायकवाड यांना शिकस्त देत संसदेचे प्रतिनीधीत्व मिळवले. संसदेतही सातत्याने विविध प्रश्न मांडत शेवाळे यांनी आपल्या कामाचा ठसा निर्माण केला आहे. शिवसेनेवर अपार निष्ठा असलेल्या शेवाळे यांची डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा आहे. योगायोग म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच शेवाळे यांचा वाढदिवस असतो. मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी आपला वाढदिवस करणे सयुक्तीक वाटत नसल्याने राजकारणात येण्याआधीपासूनच ते आपला वाढदिवस साजरा करत नाहीत. कोणा कार्यकर्त्याला तसे करूही देत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com