Rahul Pandit may corner his own party if he abides by his oath | Sarkarnama

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी श्री देव भैरीबुवासमोर घेतलेली शपथ पाळली तर शिवसेनेची अडचण !

राजेश शेळके 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

होय, मी श्री देव भैरीबुवासमोर दोन वर्षांनी माझ्या पदाचा राजीनामा देईन, अशी शपथ घेतली आहे.

-नगराध्यक्ष राहुल पंडित

रत्नागिरी : "होय, मी श्री देव भैरीबुवासमोर दोन वर्षांनी माझ्या पदाचा राजीनामा देईन, अशी शपथ घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर चर्चा करून जो आदेश देतील, त्याप्रमाणे मी पुढील काम करणार आहे,'' असा खुलासा जनतेतून थेट निवडून आलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सोशल मीडियावर केल्याने रत्नागिरीचे राजकारण ढवळून निघाले आहे. पावणे दोन वर्षे पक्षांतर्गत वाटाघाटीची चर्चा होती. त्याला  राहुल पंडित यांनी पूर्णविराम दिला. 

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी  श्री देव भैरीबुवासमोर घेतलेली शपथ खरोखर पाळली तर शिवसेनेची अडचण होणार आहे . नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून आलेले असल्याने या पदाचा राजीनामा दिल्यास अन्य नागरसेवकास संधी नाही , पुन्हा थेट नगराध्यक्षांची निवडणूक जनतेतून करावी लागू शकते . अशी निवडणूक झाल्यास शिवसेनेला पूर्वीसारखी अनुकूलता राहिलेली नाही . राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश शेटे आतापासूनच तयारीला लागलेले आहेत . 

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी 2016 मध्ये निवडणूक झाली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राहुल पंडित, मिलिंद कीर आणि बंड्या साळवी यांची नावे चर्चेत होती. शिवसेनेने पंडित यांना उमेदवारी दिली गेली . बंड्या साळवी यांनीही पूर्ण तयारी केली होती. पंडित यांना उमेदवारी दिल्याने साळवींच्या नाराजीचा निवडणुकीवर मोठा परिणाम पडणार होता. त्यांना शांत करण्यासाठी राहुल पंडित आणि बंड्या साळवी यांना दोन-दोन वर्षे नगराध्यक्षपद द्यायचे, असा अलिखित करार झाला.

 रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवा यांच्यासमोर शपथ घेण्यात आली. सोशल मीडियावरील खुलाशानंतर आज त्याला अधिकृत दुजोरा मिळाला. डिसेंबरमध्ये नगराध्यक्ष म्हणून कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यावर राहुल पंडित यांनी खुलासा केला आहे, की मी श्री देव भैरीबुवासमोर दोन वर्षांनी माझ्या पदाचा राजीनामा देईन, अशी शपथ घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर चर्चा करून जो आदेश देतील त्याप्रमाणे मी पुढील काम करणार आहे.

शिवसेनेचे वरिष्ठ नेते ही सर्व पार्शवभूमी पाहता पंडित यांनी राजीनामा दिला तरी स्वीकारतील का आणि पक्षाची नागरपालिकेवरील पकड ढिली होऊ देतील हा लाखमोलाचा प्रश्न आहे .   बंड्या साळवी   यांना नगरपालिकेत किंवा पक्षात महत्वाचे पद देऊन यावर तोडगा काढला जाईल का याबाबत उत्सुकता आहे . 

संबंधित लेख