Rahul Gandhi's congress is not able to govern Punjab : Harsimrat Kaur Badal | Sarkarnama

 राहुल गांधी यांच्या कॉंग्रेसला पंजाब सांभाळत येईना   : हरसिमरत कौर बादल 

आदित्य वाघमारे 
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पंजाबमध्ये  शिरोमणी अकाली दल भारतीय जनता पक्षासोबतच निवडणुकांना सामोरे जाणार .

- हरसिमरत कौर बादल

औरंगाबाद: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा जुना मित्र शिवसेना वारंवार स्वबळाची भाषा करत असली तरी पंजाबमध्ये मात्र शिरोमणी अकाली दल भारतीय जनता पक्षासोबतच निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. 

पैठण येथील धनगांव येथील मेगा फुड पार्कच्या उद्घाटनासाठी बादल आल्या असतांना त्यांनी प्रसारमाध्यांमाशी संवाद साधला. देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना महाराष्ट्रातील राजकारण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी झालेल्या शिवसेनेने चार वर्षे टीकेचा सपाटा लावतानाच सरकारमधील हक्क सोडलेला नाही. भाजपकडून वेळोवेळी मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा बदला म्हणूनच की काय शिवसेनेने स्वबळाची नारा देत आगामी लोकसभेत'शुद्ध' शिवसेनेचे खासदार निवडून आणण्याचा विडा उचलला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर बादल म्हणाल्या, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) मध्ये भारतीय जनता पक्षाचा जुना मित्रा असलेल्या शिरोमणी अकाली दलने आगामी लोकसभा भाजपसोबतच लढवण्याचे ठरवले आहे. आपला पक्ष हा भारतीय जनता पक्षासह त्यांच्या चांगल्या वाईट काळात कायम राहिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक आपण भाजपसोबतच लढू. शिवसेनेने काय करावे यावर मात्र त्यांनी बोलणे टाळले. 

पंजाब सांभाळत येईना.. 

राहुल गांधी देशभर अकाली दल आणि भाजपला बदनाम करत सुटले आहेत. पंजाब सारख्या लहान राज्यात वर्षभरात शेकडो शेतकरी आणि चारशेहून अधिक तरुणांचा ड्रग ओव्हरडोसने मृत्यू झाला आहे. याचा गैरफायदा घेऊन राज्यात दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून याला कॉंग्रेस सरकार जवाबदार असल्याचा आरोप देखील बादल यांनी केला. राहुल गांधी यांच्या कॉंग्रेसला पंजाब सांभाळत येईना, म्हणून ते आमच्यावर टीका करत सुटतात असेही त्या पुढे म्हणाल्या. 
 

संबंधित लेख