अमित शहांना राहुल गांधींचा टोला

अमित शहांना राहुल गांधींचा टोला

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जुन्या  नोटा बदलण्याच्या मुद्‌द्‌यावरून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना चिमटा काढला आहे. "अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक अमित शहा यांचे अभिनंदन! आपल्या बॅंकेने जुन्या नोटांचे नव्या नोटांमध्ये रुपांतर करण्याच्या स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळवले. अवघ्या पाच दिवसांत 750 कोटी रुपये. नोटबंदीमुळे कोट्यवधी भारतीयांचे आयुष्य उध्वस्त झाले. आपल्या या कामगिरीला सलाम'', अशा शब्दात ट्‌विट करून राहुल यांनी नोटबंदीची खिल्ली उडवली.

भाजपाध्यक्ष अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेमध्ये अवघ्या पाच दिवसात 745 कोटी रुपये जमा झाल्याच्या माहितीच्या आधारे कॉंग्रेसने नोटबंदीच्या निर्णयावर पुन्हा एकदा प्रहार केला आहे. हा काळा पैसा कोणाचा जमा झाला, असा सवाल करताना कॉंग्रेसने गुजरातमधील 11 सहकारी बॅंकांमध्ये नोटबंदीच्या काळात जमा झालेल्या रकमांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. 

गुजरात आणि देशभरातील सहकारी बॅंकांमध्ये नोटबंदीच्या निर्णयानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटामध्ये जमा झालेल्या रकमेचा तपशील मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये "नाबार्ड'कडून मिळवला आहे. यामाहितीचा संदर्भ देत कॉंग्रेसचे मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना नोटबंदी हा स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठा घोटाळा होता आणि आता त्याचे पुरावे समोर येत असल्याचा हल्ला चढवला.

सुरजेवाला म्हणाले, की नोटबंदीनंतर भाजपशासीत राज्यांमध्ये सहकारी बॅंकांमध्ये याच कालावधीत तब्बल 14300 कोटी रुपये जमा झाले. तर, गुजरातमधील अहमदाबादसह राजकोट, सुरत, मेहसाणा, साबरकाठा, बनासकाठा, अमरेली, भरूच, बडोदा, जुनागढ, पंचमहाल जिल्ह्यांमधील 11 जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये 3118 कोटी रुपये जमा झाले. त्यातही अमित शहा अध्यक्ष राहिलेल्या आणि आता संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेने नोटबंदीच्या काळात नोटाबदलाचा धंदा उघडला होता. या बॅंकेमध्ये अवघ्या पाच दिवसांमध्ये 745 कोटी रुपये जमा झाले. हा काळा पैसा कोणाचा आहे, असा सवाल सुरजेवाला यांनी केला आणि चौकशीची मागणी केली.

अमित शहांबद्दलचा खुलासा केंद्रातील मंत्री करू शकत नसल्यामुळे त्यासाठी पंतप्रधान मोदींनीच आता पुढे यावे, असेही आव्हान सुरजेवाला यांनी दिले. देशातील 370 जिल्हा सहकारी बॅंकांच्याही चौकशीची मागणी सुरजेवाला यांनी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com