Rahul gandhi Should retire form politics : Guha | Sarkarnama

राहुल गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी; हे देशासाठी चांगले : गुहा 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 मार्च 2018

भारतीय जनता पक्षाचा वाढता विस्तार आणि प्रभाव पाहता, काॅंग्रसची अवस्था पुढील काही वर्षे बिकट राहणार असल्याचा अंदाज अभ्यासक रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केला आहे. भाजपला टक्कर देईल, असा दुसरा पक्ष सध्या तरी नाही. काही प्रादेशिक पक्ष भाजपचा सामना करतील. पण राष्ट्रीय पातळीवर तशी स्थिती नसल्याचे गुहा यांना वाटते.

पुणे : "देशात पुढील 15 ते 20 वर्षे राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपचाच प्रभाव राहणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या जागा भल्याही वाढतील. मात्र कॉंग्रेस आता भाजपची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवृत्ती घ्यावी,'' असा सल्ला अभ्यासक रामचंद्र गुहा यांनी दिला आहे. 

ईशान्येतील तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली. यात कॉंग्रेसची बिकट स्थिती झाली. या पार्श्‍वभूमीवर गुहा यांनी हा सल्ला दिला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कॉंग्रेसच्या प्रवृत्तीवर टीका केली. 

"कॉंग्रेस पुन्हा बाळसे धरेल, असे काही दिवसांपर्यंत माझे स्मरणरंजन सुरू होते. पण आता मला त्याबाबत खात्री नाही. गांधी घराणे आता उपयुक्त राहिले नाही, असा सूर कॉंग्रेसमध्येच ऐकू येत आहे. राहुल गांधी चेष्टेचा विषय झाले आहेत. कॉंग्रेसमध्ये इतर संवेदनशील आणि बुद्धिमान लोक आहेत. मात्र ते गांधी कुटुंबावर इतके का अवलंबून आहेत, हे मला समजत नाही. हे नेते गांधी कुटुंबावर इतके अवलंबून आहेत की ती "माता-अर्भक' परिस्थितीची लक्षणे आहेत असे मला वाटते. आर्थिकदृष्ट्या हे सारे गांधीवर अवलंबून आहेत की इतर बाबींवर, हे मला समजून येत नाही.'' 

"कॉंग्रेस आगामी निवडणुकीत त्यांच्या जागांची संख्या वाढवेलही. लोकसभेतील कॉंग्रेस खासदारांची संख्या 40 वरून 60 किंवा 70 देखील होईल. चांगली परिस्थिती असेल तर ते 100 जागाही मिळवू शकतील. मात्र कॉंग्रेस पुन्हा एकदा शक्तिशाली पक्ष बनेल, असे वाटत नाही. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात कॉंग्रेसची पक्ष संघटना कमकुवत आहे. गंगेच्या प्रदेशातील राज्यात कॉंग्रेस तर अदृश्‍य आहे. केरळसारख्या काही मोजक्‍या राज्यांत कॉंग्रेसची संघटना अजून जिवंत आहे. या संघटनेची अवस्था म्हणजे रोखून धरलेल्या मृत्युसारखी आहे. कॉंग्रेसचा हा आजार शेवटच्या टप्प्यातील आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे. लग्न करावे. संसार थाटावा. त्यांच्यासाठी आणि देशासाठीही ते चांगले ठरेल,'' अशीही सूचना त्यांनी केली. 

"याचा अर्थ जनता भाजपवर खूष आहे, असा नाही. नरेंद्र मोदी यांना मतदान करणारेही त्यांच्यावर नाराज आहेत. नरेंद्र मोदींचीही खिल्ली उडवली जात आहे. गायींच्या संरक्षणाच्या नावाखाली आज धंदा सुरू आहे. मोदींच्या बढाईखोर आणि पोकळ आश्‍वासनांचा जनतेला कंटाळा आला आहे. मात्र जनतेला पर्याय सापडत नाही. या आधी अरविंद केजरीवला आणि नितीशकुमार हे पर्याय वाटत होते. मात्र ते देखील लुप्त झाले आहेत,'' असेही गुहा यांनी सांगितले. 

संबंधित लेख