Rahul Gandhi doesn't meet any group from Nagpur congress | Sarkarnama

नागपूर काँग्रेसच्या दोन्ही जम्बो शिष्टमंडळाना  राहुल गांधींनी भेट नाकारली 

 सुरेश भुसारी : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 7 मार्च 2018

नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे जम्बो शिष्टमंडळ दिल्लीत गेल्याची कुणकुण कळल्याबरोबर असंतुष्ट गटाने गाडी पकडून दिल्ली गाठली. आता नागपूर शहर कॉंग्रेस समितीतील संतुष्ट व असंतुष्ट दोन्ही गट कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना युक्तीवाद ऐकवित आहेत . यापैकी एकाही गटाला राहुल गांधी यांनी भेट दिली नाही.

नागपूर :  नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे जम्बो शिष्टमंडळ दिल्लीत गेल्याची कुणकुण कळल्याबरोबर असंतुष्ट गटाने गाडी पकडून दिल्ली गाठली. आता नागपूर शहर कॉंग्रेस समितीतील संतुष्ट व असंतुष्ट दोन्ही गट कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना युक्तीवाद ऐकवित आहेत . यापैकी एकाही गटाला राहुल गांधी यांनी भेट दिली नाही.

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वातील संतुष्ट गट व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या नेतृत्वातील असंतुष्ट असे दोन गट आहे. काही दिवसांपूर्वीच सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढून टाकल्याने असंतुष्ट गटात नाराजी पसरली आहे.

चतुर्वेदी यांचे निलंबन केल्याबद्दल आभार मानण्यासाठी मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील 40 जणांचे जम्बो शिष्टमंडळ दिल्लीत मंगळवारी दाखल झाले. चतुर्वेदी यांच्यावर कारवाई केल्याने नागपूर शहर कॉंग्रेसमध्ये शिस्त येईल, असा दावा नागपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला. चतुर्वेदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाशी कशी "गद्दारी' केली याचे पुरावेही कॉंग्रेस नेत्यांना दाखविले असल्याचा दावा करण्यात आला आहे . 

असंतुष्टांचे म्होरके सतीश चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात दुसऱ्याच दिवशी 55 जणांचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले. चतुर्वेदी यांना पक्षातून निष्कासित केल्याने ते मात्र नेत्यांच्या भेटीला गेले नाही. माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या.

नागपूर शहर कॉंग्रेस समितीतील बहुसंख्य लोक आमच्या पाठीशी आहेत. मुत्तेमवार व विकास ठाकरे हे दोघेच पक्ष चालवितात. इतरांना काहीही स्थान नसल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा असंतुष्ट गटाने केला. यापैकी एकाही गटाला राहुल गांधी यांनी भेट दिली नाही. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून संतुष्ट व असंतुष्ट गट नागपुरात परत येणार आहे.

संबंधित लेख