rahul desai in kolhapur | Sarkarnama

देसाईंची तिसरी पिढी आमदारकीसाठी रिंगणात

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 डिसेंबर 2018

कोल्हापूर : गारगोटीच्या देसाई कुटुंबात आजोबा आणि वडीलांनी आमदारकी मिळवली. आता तिसऱ्या पिढीला राहुल देसाई यांच्या माध्यमातून आमदारकीचे वेध लागले आहेत. मुखमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राहुल याना भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातून आगामी निवडणुकीत सेना भाजपा युती झाली तर देसाईंची अवस्था सासू नको म्हणून कॉंग्रेस सोडली आणि भाजपात जाऊन सासुच वाट्याला आली, अशी होणार आहे. हा डाव ओळखून देसाई यांनी आपल्या गटाच्या ताकतीवर मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे. 

राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत दुर्गम मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. एकाच घरातील वडील आणि मुलगा आमदार करणारा हा मतदारसंघ नातवाला आमदार करणार का, याची आता चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी आनंदराव देसाई हे आमदार झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र बजरंग देसाई आमदार झाले. आता बजरंग देसाईंचे पुत्र विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. 

राहुल देसाई यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. आता त्यांच्या पत्नी रेश्‍मा देसाई कॉंग्रेस मधून जिल्हा परिषद सदस्या आहेत. तर भाऊ धैर्यशील देसाई गोकुळचे संचालक आहेत. मनमिळाऊ युवक नेता अशी त्यांची ओळख आहे. कॉंग्रेस मधून शिवसेनेत आलेले व याच मतदार संघातून आमदार झालेले प्रकाश आबिटकर यांना ते विधानसभेला आव्हान देणार आहेत. आमदार आबिटकर हे सेनेत असले तरीही कॉंग्रेस नेत्यांचे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे कॉंग्रेस मधून विधानसभा लढण्यात अडचणी येतील, याचा अंदाज आल्याने राहुल यांनी भाजपात प्रवेश केला. 

राहुल देसाई यांना भाजपात घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले. गारगोटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठ्या ताकतीने देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यांना ग्रीन सिग्नल दिला. मात्र भाजपात गेल्यानंतर देसाई याना म्हणावी तेवढी ताकत मिळाली नाही. उलट कॉंग्रेस पेक्षा जास्त स्पर्धक भाजपात दिसत आहेत. यातच आता सेना-भाजप युतीची चर्चा सुरू आहे. असे झाले तर, ही जागा सेनेला म्हणजे आमदार प्रकाश आबिटकर यांना सोडावी लागणार आहे. जर सेनेला ही जागा दिली तर राहुल देसाई पक्षाचा आदेश पाळून सेनेला मदत करणार की अन्य काही पर्याय शोधणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आजच्या भव्य कृषी मेळाव्यात त्याबाबतची दिशा स्पष्ट होईल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. 

संबंधित लेख